एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचा शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या राज्यभरातील उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. थोड्यात वेळात याबाबत अधिकृत घोषणा होईल. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाची माहिती दिली. त्यानंतर इतरही मंत्र्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना अवगत केले आणि हे नियम 2025 पासून लागू करण्याची विनंती केली.
या निर्णयानंतर आंदोलक विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. “विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी केलेल्या आंदोलनाचा हा विजय आहे. आजचा दिवस आमच्यासाठी दिवाळीसारखा आहे. या निर्णयासाठी सरकारचे आभार मानतो. आता जोमाने अभ्यासाला लागू,” अशी प्रतिकिया आंदोलक विद्यार्थ्यांनी दिली. यासोबतच आंदोलनात सहभादी झालेले आमदार गोपीचंद पडळकर, अभिमन्यू पवार तसंच या मागणीचा पाठपुरावा करणारे आमदार रोहित पवार यांनी देखील सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
या आधीही पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात या आंदोलनाचं लोण पसरलं होतं. पुणे, नाशिक आणि औरंगाबादमध्ये शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या विद्यार्थ्यांनी जोरदार निदर्शने केली होती. MPSC students protest
आंदोलनाच्या ठिकाणी भाजपचे अभिमन्यू पवार आणि गोपीचंद पडळकर हे देखील उपस्थित होते. आमदार गोपीचंद पडळकर यांनी या आंदोलनादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बातचीत करत विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले. यावेळी फडणवीस यांनी हा विषय आज मंत्रिमंडळ बैठकीत मांडला जाईल आणि निर्णय घेऊ अशी आश्वासन दिलं होतं.