Monday, September 16, 2024

महाराष्ट्र लॉकडाऊन : 2 एप्रिलला मर्यादित लॉकडाऊनची शक्यता, सार्वजनिक वाहतूक बंद होणार का ?

Live Janmat

लॉकडॉऊनचे नियम शिथिल होऊन काही महिने उलटत नाहीत तोपर्यंत सामान्य जनतेवर पुन्हा लॉकडॉऊनची टांगती तलवार आहे.

मागील वर्षी म्हणजेच 25 मार्च 2020 रोजी देशात पहिला लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. 25 मार्च ते 14 एप्रिल असा 21 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला होता. पुढे हा लॉकडाऊन वाढत वाढत गेला. लॉकडाऊनच्या वर्षानंतरही अजूनही कोरोनाचं थैमान सुरुच आहे. महाराष्ट्रात गेल्या आठवड्याभरात दररोज 30 हजारापेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊनची टांगती तलवार राज्यावर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची महत्वाची बैठक दोन दिवसापूर्वी पार पडली. या बैठकीत लॉकडाऊनच्या निर्णयाबाबतही चर्चा झाल्याचं कळतंय. त्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनचं नियोजन करण्याचे निर्देश दिले होते.

राज्यात सध्या लागू असलेले निर्बंध:

  • रात्री आठ ते सकाळी सात वाजेपर्यंत सर्व सार्वजनिक स्थळं बंद आहेत. तसंच जमावबंदीही लागू करण्यात आली आहे.
  • नियमांचे उल्लंघन केल्यास तसंच पाचपेक्षा अधिक लोक एकत्र आल्यास एक हजार रुपये दंड आकारला जात आहे.
  • मास्कशिवाय फिरल्यास 500 रुपये दंड तर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास एक हजार रुपये दंडसामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांना परवानगी नाही.
  • रात्री आठ ते सकाळी सातपर्यंत हॉटेल्स, सिनेमाहॉल, मॉल्स, सभागृह बंद राहणार
  • लग्नकार्यासाठी 50 लोक उपस्थित राहू शकतात. तर अंत्यविधीसाठी 20 लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी
  • मास्क आणि पुरेसे अंतर राखून सार्वजनिक वाहतूक सुरू राहिल.
  • खासगी कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांनाच उपस्थित राहण्याची परवानगी
  • रुग्णसंख्या कमी करण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूचना दिल्या आहेत.

2 एप्रिलला लॉकडाऊन केलाच, तर नियम काय असतील?

कोरोनासोबतच लॉकडाऊन या शब्दानेही डोकं वर काढलंय. पण जर 2 एप्रिलला लॉकडाऊन लागलाच तर तो आधीच्या लॉकडाऊनहून वेगळा असणार आहे.

गर्दीची ठिकाणं पूर्ण बंद ठेवण्याची चिन्हं

आधीच्या लॉकडाऊनमध्ये सगळ्याच गोष्टी बंद करण्याचे आदेश होते. तर या लॉकडाऊनमध्ये फक्त गर्दीची ठिकाणं बंद केली जातील. आता ही गर्दीची ठिकाणं कुठली तर शॉपिंग मॉल, मल्टिप्लेक्स, समुद्र किनारे, गार्डन्स, नाट्यगृह. थोडक्यात जिथं जिथं तुम्ही विरंगुळ्यासाठी जाता, ती सगळी ठिकाणं बंद केली जातील.

मागील लॉकडाऊन हा सलग होता. म्हणजे, 24*7 सगळं बंद ठेवण्याचे आदेश होते. मात्र, आताच्या लॉकडाऊनला विशिष्ट वेळ दिली जाण्याची शक्यता आहे. ती वेळ कदाचित सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंतची असू शकेल. सध्या अनेक शहरात नाईट कर्फ्यू लावला जातो. त्यात धर्तीवर नाईट कर्फ्यू न लावता दिवसा कर्फ्यू लावण्याची तयारी प्रशासन करतंय. शिवाय हा लॉकडाऊन अगदी 5 किंवा 7 दिवसांचा असू शकतो, दीर्घ कालावधीचा लॉकडाऊन नसेल अशी प्राथमिक माहिती आहे

भाजीपाला, किराणा मिळणार का?

मग प्रश्न येतो, भाजीपाला, किराणा आम्हाला मिळणार का? की हा आधीच भरुन ठेवायचा? तर या लॉकडाऊनमध्ये भाजीपाल्याच्या बाजारपेठा आणि किराणा दुकानं एका विशिष्ट वेळेत उघडी ठेवण्याची मुभा असेल. जेणेकरुन अन्नधान्याचा कुठलाही तुटवडा होणार नाही. शिवाय दुकानदार, शेतकरी यांचंही नुकसान होणार नाही याची काळजी सरकार घेणार आहे.

आंतरजिल्हा वाहतूक सुरु राहणार का?

काहींचा प्रश्न असाही असू शकतो, की मागील वेळी जशा आंतरजिल्हा बस बंद झाल्या होत्या तशा याही वेळी होतील का? तर सुरुवातीला तरी असं केलं जाणार नाही. आंतरजिल्हा बस बंद करण्याचा निर्णय परिस्थिती खूपच खराब झाली तर घेतला जाईल असं सरकारी सूत्रांकडून कळतंय. कारण, आंतरजिल्हा वाहतूक बंद केली तर औद्योगिक आणि कृषी क्षेत्राचं मोठं नुकसान होतं. ते यंदा होऊ न देण्याचा प्रयत्न सरकारचा असणार आहे.

बसस्टँडपासून रेल्वेस्टेशनपर्यंत कोरोना चाचण्या करण्याचं नियोजन

हेच नाहीतर रेल्वेस्टेशन्स, विमानतळं, बसस्थानकं इथं कोरोना चाचण्या करण्याचंही धोरण सरकारने ठरवलं आहे. जास्तीत जास्त चाचण्या करुन कोरोना रुग्णांन वेगळं करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. शिवाय, लसीकरणाचीही गती वाढवून निवडणुकांच्या धर्तीवर लसीकरण केलं जाणार आहे. लोकांना लसीकरण बूथपर्यंत आणण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांपासून स्वयंसेवकांना नेमण्याचाही विचार सरकार करतंय.

एकूणच लॉकडाऊनचा अर्थ वर्षभरात बदलला आहे. अर्थकारणाला फटका न देता, लॉकडाऊन करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. मात्र, हा लॉकडाऊन होऊच नये यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग आणि काही लक्षणं दिसली की लगेच कोरोना चाचणी करणं गरजेचं आहे. लॉकडाऊन लागलाच, तर त्याचं काटेकोरपणे पालनही गरजेचं आहे.

सत्ताधारी पक्षांचाही लॉकडॉऊनला विरोध?

विरोधकांसह सत्ताधारी पक्षांनीही लॉकडॉऊनला विरोध दर्शवला आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडॉऊनचा निर्णय घेऊ नये यासाठी आम्ही आग्रही,” असल्याचं अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

नवाब मलिक म्हणाले, “महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. 24 तासांत 40,000 नवीन रुग्णांची नोंद महाराष्ट्रात झाली. यामुळे मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला लॉकडॉऊनच्यादृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश दिले. पण याचा अर्थ लॉकडॉऊनबाबत निर्णय झालेला नाही. लोकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. लॉकडॉऊन राज्याला किंवा जनतेला कोणालाही परवडणारे नाही.”

मलिक पुढे म्हणाले, “आम्ही सर्वांनी मुख्यमंत्र्यांना लॉकडॉऊन हा उपाय होऊ शकत नाही असे सांगितले आहे. आपण आरोग्य व्यवस्था निर्माण केली पाहिजे. पण वाढत्या रुग्णसंख्येमुळे बेड्सची व्यवस्था अपुरी पडू शकते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तसे निर्देश दिले असावेत.”

तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लॉकडॉऊन लागू केल्यास बुडणाऱ्या रोजगाराची भरपाई सरकारने रोख रकमेद्वारे लाभार्त्यांच्या बँक खात्यात जमा करावी अशी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्य पातळीवर लॉकडॉऊनची अपरिहार्यता निर्माण झाल्यास सरकारने काही गोष्टी विचारात घ्याव्यात असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

रंकाळाच्या नियोजनबद्ध संवर्धनासाठी आणि विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत- सतेज पाटील

Live Janmat

कोल्हापूर शहराचा ‘क्विन ऑफ नेकलेस’ असलेल्या ऐतिहासिक रंकाळा तलाव……

ऐतिहासिक रंकाळा तलावाजवळील रंकाळा पदपथ उद्यानात स्वयंचलित पद्धतीने (रोबोटिक सेन्सरने) तयार करण्यात आलेले सजीव भासणारे प्राणी, रंकाळा सुशोभीकरण, पदपथ उद्यानातील विविध विकासकामे, अमृत योजनेअंतर्गत पुर्ण केलेल्या एकूण सव्वा दोन कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ आज करण्यात आले.

कोल्हापूरचे वैभव असणारा रंकाळा पाहण्यासाठी कोल्हापूरला आलेले भाविक आणि पर्यटक हमखास भेट देतात. याचसोबत कोल्हापूरकर सुद्धा दररोज तसेच सुट्टीच्या दिवशी रंकाळ्यावर फेरफटका मारतात. कोल्हापुरातील पर्यटनवाढीसाठी रंकाळा हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. याच पार्श्वभूमीवर रंकाळा पदपथ उद्यानात स्वयंचलित पद्धतीने (रोबोटिक सेन्सर बसविलेले) ही रेखीव शिल्पे साकारण्यात आली आहेत. यामुळे, येणाऱ्या काळात ही शिल्पे या उद्यानातील आकर्षणाचा केंद्र ठरतील, हे नक्की.

ईमहाराष्ट्र राज्यामधे प्रथमच आपल्या कोल्हापूर शहरात रंकाळा पदपथ उद्यानात रोबोटिक सेन्सर असलेले विविध प्रकारचे प्राणी बसविले आहेत. त्याद्वारे, कोल्हापूरचे वैभव असलेल्या रंकाळा तलावाच्या सौंदर्यामधे भर पडणार आहे. रंकाळा आणि परिसराच्या नियोजनबद्ध संवर्धनासाठी आणि विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे सतेज पाटील यांनी आपल्या फेसबूक पोस्ट द्वारे संगितले.

यावेळी, मा. वसंतराव देशमुखदादा, आ. ऋतुराज पाटील, शारंगधर देशमुख, माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर संजय मोहिते, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, राजेंद्र पाटील, श्रीमती दीपा मगदूम, रिना कांबळे, सौ. माधुरी लाड, सचिन पाटील, नेत्रदीप सरनोबत, सौ. पल्लवी बोळाईकर तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.