कोल्हापूर आणि विमानतळ हा कोल्हापूरच्या राजकारणात जणू मिसळेच्या तडक्यासारख्या झणझणीत विषय गेल्या दशकापासून बनला आहे. अखेर संजय घोडावत यांच्या स्टार एअर कंपनीची कोल्हापूर – मुंबई विमानसेवा आजपासून सुरू झाली. आठवड्यामध्ये मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या तीन दिवशी कोल्हापूरहून मुंबईला उड्डाण होणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्यामध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर आनंदाचे वातावरण झाले आहे. जशी काय विमानसेवा सुरू होते न होते, तशी भलीमोठी जाहिरात कोल्हापुरात फिरत आहे. विमानसेवा सुरू करण्याचा मानकरी कोण अशी चर्चा कोल्हापूरच्या गल्लीबोळात होताना दिसत आहे. कारणही तसंच आहे, विमानतळाच्या जाहिरातीत धनंजय महाडिक वगळता जिल्ह्यातील सर्व नेते आहेत. त्यामुळे कोल्हापूरकरांना प्रश्न पडला आहे. खरंच यांनी विमानसेवा सुरू केली का ? हीच सर्वसामान्य कोल्हापूरवासियांची खदखद धनंजय महाडिक यांनी ‘काम न करता जाहिरात लय भारी’ अशा कोल्हापुरी ठसक्यात व्यक्त केली.
धैर्यशील माने यांनी या कार्यक्रमात संजय घोडावत यांच्या नावात स म्हणजे सतेज पाटील, जय म्हणजे धनंजय महाडिक अशी भावना व्यक्त केली. याचीच किनार पकडत धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांचे नाव न घेता ” विमानळाची कार्यक्रमाची एक जाहिरात देण्यात आली. त्यामध्ये धनंजय महाडिक वगळता जिल्ह्यातील सगळे नेते आहेत. समस्त कोल्हापूरकर या नावाने ही जाहिरात दिली. मात्र काम न करता जाहिरात लय भारी” अशा शब्दात उपरोधिक टोला लगावला. त्यामुळे कोल्हापुरात पुन्हा राजकीय कलगी-तुरा पहायला मिळणार हे मात्र नक्की !
असी असेल विमानसेवा
कोल्हापूर ते मुंबईसाठी 2 हजार 573 रुपये इतका तिकीट दर असेल.
मुंबईहून सकाळी 10:30 वाजता टेकऑफ तर कोल्हापुरात 11:20 वाजता लॅंडींग
कोल्हापूरहून सकाळी 11:50 वाजता टेकऑफ तर मुंबईत 12:45 वाजता लॅंडींग होणार
दुसरीकडे कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशांना ही सेवा सोयीची ठरणार आहे. सध्या कोल्हापूरहून तिरूपती, बंगळूर, अहमदाबाग, हैद्राबाद या शहरात सध्या विमानसेवा सुरू आहे. या सेवेमुळे प्रवाशांना वेळ वाचणार आहे .