नेपोलियन सोनूले यांच्या कडून ‘घरपोच मोफत भाजीपाला’ उपक्रम

Live Janmat

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 15 मे पासून कडक लॉकडाऊन सुरू आहे. दूध, वृत्तपत्रे आणि वैद्यकीय सुविधा वगळता इतर सर्व व्यवहार पूर्णतः बंद आहेत. कृषीमाल खरेदी विक्री चे व्यवहार चालणारी कृषी उत्पन्न बाजार समिती (मार्केट यार्ड) देखील प्रथमच पूर्णतः बंद आहे. बाजार समिती बंद असल्याने फळे, भाज्या इत्यादींचे व्यवहार थांबले आहेत. एकीकडे नागरिकांना भाजीपाला मिळणे दुरापास्त झाले आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांना नाशवंत असणारा त्यांचा माल वेळेत विकता न आल्याने आर्थिक फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरातील सामाजिक कार्यकर्ते नेपोलियन सोनूले हे थेट शेतकऱ्यांकडून भाजीपाला खरेदी करून परिसरातील सुमारे दोन हजार घरांमध्ये आठवडाभर पुरेल अशा पद्धतीने भाजीपाला मोफत घरपोच देण्याचा उपक्रम राबवत आहेत.

लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात झाली. डॉ. अशोक सोनूले आणि सौ. शिला सोनूले हे दांपत्य गेली अनेक वर्षे समाजकारण, राजकारण यांमाध्यमातून लोकसेवेत अखंडपणे कार्यरत आहेत. डॉ. अशोक सोनूले यांच्या मार्गदर्शनानुसार कोरोना महामारी मध्ये सेवाकार्यासाठी विविध माध्यमांतून नेपोलियन सोनूले कार्यरत आहेत. बुधवार पेठ, सिद्धार्थनगर, ब्रह्मपुरी, ख्रिश्चन वाडा या परिसरातील सुमारे दोन हजार हून अधिक घरात आठ दिवस पुरेल इतका भाजीपाला मोफत व घरपोच मिळेल याकरिता नियोजनबद्धपणे पन्नास स्वयंसेवकांची फौज राबत आहे.

कोरोना महामारीत, बाहेर पडण्यावर निर्बंध असताना व भाजीपाला उपलब्ध नसताना नेपोलियन सोनूले यांनी लोकांची गरज ओळखून राबविलेल्या ‘घरपोच मोफत भाजीपाला’ उपक्रमाचे कौतुक परिसरात होत आहे. शिवाय या उपक्रमामुळे भाजीपाल्यासाठी नागरिकांची धावाधाव थांबल्याने प्रशासनासही सुव्यवस्था राखण्यात मोठी मदत झाली आहे.

vishal  के बारे में
vishal The live janmat is a Marathi digital News web portal. We aim to report the latest news, views, and entertainment. We seek to look at policies and decision-making from the perspective of people. Read More
For Feedback - livejanmt@gmail.com