मुंबई – बीड जिल्ह्यातील भाजप आमदार सुरेश धस आणि त्यांचे कार्यकर्ते सतीश भोसले उर्फ ‘खोक्या’ यांची चर्चा सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात होत आहे. यावर भाष्य करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. “एका खोक्या भाईचं काय घेऊन बसलात, विधानसभेत तर सगळेच खोके भाई भरले आहेत!” असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले.
मुंबईत झालेल्या मनसे पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते. आगामी महापालिका निवडणुकांसाठी या मेळाव्यात रणनीती ठरवण्यात आली. त्याचबरोबर राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी सरकारवर टीकेचे बाण सोडले.
Table of Contents
Toggle“मूळ विषय सोडून जनतेला भरकटवलं जातंय”
राज्यात महत्त्वाचे प्रश्न असताना सरकार त्याकडे लक्ष न देता दुसऱ्याच मुद्द्यांवर भर देत आहे, असा आरोप करत “जनतेला मूळ विषयांपासून भरकटवण्याचं काम सुरू आहे” असे राज ठाकरे म्हणाले. त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, “मनात अनेक गोष्टी साचल्या आहेत, त्या सर्व गुढीपाडवा मेळाव्यात बोलेन.” हा मेळावा ३० मार्च रोजी मुंबईतील शिवाजी पार्क येथे होणार आहे, आणि राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
मुंबई महापालिकेसाठी मनसेची तयारी सुरू
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने पक्षसंघटनेत मोठे बदल केले आहेत. रविवारी रविंद्र नाट्य मंदिरात झालेल्या बैठकीत मुंबई महापालिकेच्या संदर्भात काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या ठरवण्यात आल्या.
मनसेच्या नव्या मुंबई संघटनेची यादी
- मुंबई शहर अध्यक्ष – संदीप देशपांडे
- दक्षिण मुंबई शहर उपाध्यक्ष – यशवंत किल्लेदार
- पश्चिम उपनगर शहर उपाध्यक्ष – कुणाल माईणकर
- पूर्व उपनगर शहर उपाध्यक्ष – योगेश सावंत
- गटप्रमुख आणि शाखाध्यक्ष प्रमुख – अमित ठाकरे
- विभाग अध्यक्ष प्रमुख – नितीन सरदेसाई
- केंद्रीय समिती सदस्य – बाळा नांदगावकर आणि अविनाश अभ्यंकर
गर्दीपासून मतांपर्यंतचा प्रवास… यश मिळणार?
राज ठाकरे यांच्या सभांना मोठ्या प्रमाणावर गर्दी होते, मात्र ही गर्दी मतांमध्ये बदलण्यात मनसेला वारंवार अपयश आले आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षसंघटनेत मोठे बदल करून मनसेनं नवी रणनीती आखली आहे. मात्र हे बदल पक्षाला यश मिळवून देतील का? हे आगामी निवडणुकीत स्पष्ट होईल.