- नागपुरात ७५ हजार कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण – भूमिपूजन
नागपूर, दि. ११ : आपल्या सरकारकडून पायाभूत सुविधांना मानवी चेहरा दिला जात असून विविध क्षेत्रात मूलगामी परिवर्तन घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यातून वंचित-उपेक्षितांच्या विकासास अग्रक्रमाने प्राधान्य देण्यात येणार आहे, अशी ग्वाही देशाचे प्रधानमंत्री (Prime Minister Narendra Modi) नरेंद्र मोदी यांनी आज येथे दिली. स्थायी विकासाचे धोरण हे देशासाठी सर्वाधिक गरजेचे असून त्यास सर्व घटकांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहनही प्रधानमंत्र्यांनी केले.
मिहान (नागपूर) येथील एम्स संस्थेजवळील मंदीर मैदानावर आयोजित कार्यक्रमात विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आ. चंद्रशेखर बावनकुळे आदी यावेळी उपस्थित होते.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्ग उदघाटन, नागपूर मेट्रो टप्पा-१ लोकार्पण, नागपूर मेट्रो टप्पा-२ भूमिपूजन, नागपूर ते बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेस शुभारंभ, नागपूर आणि अजनी रेल्वे पुनर्विकास शुभारंभ, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) नागपूर राष्ट्राला समर्पित, नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प भूमिपूजन, सेंटर फॉर स्किलींग ॲड टेक्निकल सपोर्ट (सपेट), चंद्रपूर लोकार्पण असे विविध कार्यक्रम आज पार पडले.
नागपूर येथे आज ज्या विविध योजनांचे लोकार्पण झाले त्यातून सरकारचा विकासाचा सर्वसमावेशक दृष्टीकोन प्रतिबिंबित होतो. एम्स, समृद्धी महामार्ग, वंदे भारत गाडी, मेट्रो हे सारे विविध प्रकल्प विविध क्षेत्रातील जनतेच्या हिताचे आहेत. जीवनाच्या विविध अंगांना आम्ही त्यातून स्पर्श करीत आहोत असे सांगून श्री. मोदी म्हणाले, आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला वैद्यकीय सुविधा उपलब्ध केल्या आहेत. विविध धर्मक्षेत्रांच्या विकासातून सांस्कृतिक पायाभूत सुविधा निर्माण झाल्या आहेत. जनधन योजनेच्या माध्यमातून ३५ कोटी गरीबांना बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यात आले आहे. एम्स संस्थेच्या उभारणीसह प्रत्येक जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालये ही वैद्यकीय पायाभूत सुविधांची उदाहरणे आहेत. या साऱ्यांच्या माध्यमातून मानवी संवेदना जोपासल्या गेल्या आहेत. जेव्हा अशा सुविधा देताना मानवी चेहरा नसतो तेव्हा त्याचा जनतेला मोठा फटका बसतो असे सांगताना त्यांनी गेली ३०-३५ वर्ष रखडलेल्या गोसीखुर्द प्रकल्पाचे उदाहरण दिले.
विकासाला जेव्हा मर्यादित ठेवले जाते तेव्हा निर्माण होणाऱ्या संधीही मर्यादित असतात असे सांगून प्रधानमंत्री (Prime Minister) म्हणाले, यापूर्वी शिक्षण मर्यादित होते तेव्हा येथील गुणवत्ताही पूर्ण क्षमतेने समोर आली नाही. यामुळे मोठा वर्ग विकासापासून वंचित राहिला, त्याचा परिणाम म्हणून देशाची खरी ताकद पुढे आली नाही. मात्र, गेल्या आठ वर्षात आम्ही दृष्टीकोन आणि विचारपद्धतीत बदल घडविला. ‘सबका साथ, सबका विकास’ या सूत्राच्या सार्थकतेसाठी ‘सबका प्रयास’ही गरजेचा आहे. त्यात देशातील प्रत्येक नागरिक सहभागी झाला तरच देश विकसित होवू शकेल. आजवर जे वंचित-उपेक्षित राहिले ते आता आमच्या प्राधान्यक्रमाच्या अग्रस्थानी आहेत, हे स्पष्ट करताना प्रधानमंत्र्यांनी ‘वंचित को वरियता’ हे या सरकारचे सूत्र असल्याचे आग्रहाने सांगितले. शेतकरी, पशुपालक, रस्त्यावरील विक्रेते अशा विविध वर्गांचा विचार करून योजना राबविल्या जात आहेत. देशातील आकांक्षित जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न होत आहे. हे जिल्हे प्रामुख्याने आदिवासीबहुल आहेत. गेल्या आठ वर्षात आम्ही विविध वंचित क्षेत्रांना विकासाचे केंद्रे बनवित आहोत, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
राजकीय स्वार्थासाठी देशाचा पैसा लुटण्याचा शॉर्टकट अवलंबणाऱ्या प्रवृत्तीवर कठोर टीका करून प्रधानमंत्री म्हणाले, केंद्र सरकार पुढील २५ वर्षांचे उद्दिष्ट्य आखून काम करीत आहे. मात्र, काही प्रवृत्ती देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करीत आहेत. चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरठयावर आपण आहोत अशी संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही, ‘शॉर्टकट’ वृत्तीने देश चालू शकत नाही. दूरगामी दृष्टीकोन असल्याशिवाय देशाचा स्थायी विकास होवू शकत नाही. हा मुद्दा स्पष्ट करताना प्रधानमंत्र्यांनी सिंगापूरचे उदाहरण दिले. यापूर्वी प्रामाणिक करदात्यांनी दिलेला पैसा चुकीच्या आणि अनिष्ट बाबींसाठी खर्ची पडला आता हा पैसा युवा पिढीच्या भविष्यासाठी खर्च झाला पाहिजे ही काळाची गरज आहे. ‘आमदनी अठ्ठणी खर्चा रुपया ‘ या प्रवृत्तीमुळे देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होवू शकते अशा प्रवृत्ती पासून देश वाचवला पाहिजे ‘शॉर्टकट’ ऐवजी स्थायी विकासाचे धोरणच आपली मोठी गरज आहे. देशहितासाठी सर्वांनी त्याला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, असे आवाहनही प्रधानमंत्र्यांनी आपल्या भाषणाच्या अखेरीस केले.
महाराष्ट्राला प्रगतीकडे नेणार – मुख्यमंत्री
आपण सुरुवात केलेल्या प्रकल्पाचे लोकार्पण करण्याचा आनंद आणि समाधान आहे. त्यातही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्याहस्ते हे लोकार्पण होत असल्याचा आपणास आनंद आणि अभिमान आहे. अशा भावना व्यक्त करुन मुख्यमंत्री म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी जे स्वप्न पाहिले होते त्या स्वप्नाची ही पूर्ती आहे. या प्रकल्पात विक्रमी वेळेमध्ये भूमी अधिग्रहण करण्यात आले. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात आली. शेतकऱ्यांना थेट आरटीजीएस करून पैसे देण्यात आले. हा इकॉनॉमिक कॅारिडॉर आहे त्यासोबतच ग्रीन कॅारिडॉर सुद्धा आहे. या ठिकाणी वन्यजीवांचीही विशेष काळजी घेतली आहे. खऱ्या अर्थाने समृद्धी महामार्ग ही महाराष्ट्राची भाग्यरेषा ठरणार आहे. लक्षावधी लोकांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे. सर्व घटकांच्या हिताचे आपले सरकार असून प्रगतीच्या दिशेने महाराष्ट्राला नेण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
विदर्भ – मराठवाड्याच्या विकासाला चालना : नितीन गडकरी
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासासाठी आवश्यक होता. या प्रकल्पाच्या माध्यमातून या भागातील विकासाला चालना मिळेल, असा अशावाद व्यक्त करुन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालिन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने अत्यंत दर्जेदार काम केले आहे. यापूर्वी त्यांनी मुंबई-पुणे हा महामार्ग तसेच वांद्रे वरळी सी-लिंक या प्रकल्पाचे काम केले आहे. आता हा आणखी एक महत्वाकांक्षी प्रकल्प त्यांनी पूर्णत्वास नेला आहे. याशिवाय विविध रस्ते आणि रेल्वे प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर आहेत. प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वात लवकरच औरंगाबाद ते पुणे या महामार्गाचे काम पूर्णत्वास येत आहे. महाराष्ट्रात ७५ हजार कोटी रुपयांचे ग्रीन हायवे लवकरच पूर्णत्वास येईल, असे ते म्हणाले.
नागपूर विमानतळाचे लवकरच भूमिपूजन – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी प्रधानमंत्र्यांनी (Prime Minister Narendra Modi) दिलेल्या खंबीर पाठबळाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या महामार्गाच्या माध्यमातून अप्रत्यक्षरित्या पुढील दोन वर्षात ५० हजार कोटी प्राप्त होतील. त्यातून इतर पायाभूत सुविधांची कामे होऊ शकतील. केंद्र सरकार राबवत असलेल्या गतिशक्ती योजनेचे उत्तम उदाहरण म्हणजे समृद्धी महामार्ग होय. या महामार्गाच्या मल्टीयुटीलिटी कॉरिडॉरच्या माध्यमातून गॅस पाईपलाईन, पेट्रोलियम प्रॉडक्ट पाईप लाईन, अंडर सी केबल सोबतच दृतगती रेल्वे मार्गाची तरतूद अशा विविध बाबी जोडल्या जात आहेत. त्याचा डेटा सेंटर निर्मितीसाठी उपयोग होऊ शकेल. सौरऊर्जा निर्माण होणार आहे. अशा अनेक बाबींतून हा प्रकल्प अधिक समृद्ध केला जाणार आहे. शहरातील रेल्वे स्थानक सुसज्ज करण्यात येत आहेत. रेल्वे, रस्ते, हायस्पीड ट्रेन अशा अनेक प्रकल्पांची कामे होत आहेत. नागपूर-गोवा महामार्गाची लवकरच उभारणी करण्यात येणार आहे. मल्टीमॉडेल कनेक्टिव्हिटी निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न पूर्णत्वाकडे जात आहे. राज्यातील जिल्हे प्रमुख बंदराशी जोडतांना महाराष्ट्राचा ‘पोर्टलेड’ विकासासह विविधांगी दृष्टीकोनातून विकास करण्यात येत आहे असे सांगताना नागपूर येथील नव्या विमानतळाच्या भुमिपूजनाच्या उद्घाटनाचे निमंत्रणही लवकरच प्रधानमंत्री श्री. मोदी यांना देण्यात येईल, अशी घोषणाही श्री. फडणवीस यांनी केली. नागपूर शहरातील मेट्रो टप्पा दोन आणि नाग नदी प्रदूषण निर्मूलन हे दोन्ही प्रकल्प मधल्या काही काळात रखडले होते मात्र, प्रधानमंत्री कार्यालयाच्या पुढाकाराने केवळ 35 दिवसात मंजुरी देण्यात आल्याने सांगून त्यांनी विशेष आभार मानले.
विकासाच्या नभांगणातील अकरा तारे !
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज आपल्या भाषणात विकासाच्या नभांगणातील अकरा तारे असा नागपुरातील विविध लोकार्पण व उदघाटन कार्यक्रमांचा उल्लेख केला. हे तारे असे…
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग – महाराष्ट्राच्या विकासाची भाग्यरेखा ठरणा-या ५५ हजार कोटींच्या सहापदरी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या ५२० किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन करण्यात आले.
- नागपूर मेट्रो फेज १ – नागपूर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करणा-या ४० किलोमीटर अंतराच्या ९ हजार ३०० कोटी खर्चाच्या प्रकल्पाचे लोकार्पण
- नागपूर मेट्रो फेज २ – नागपुरातील मेट्रो जाळे हिंगणा, कन्हाण बुटीबोरीपर्यंत विस्तारित करणा-या ४४ किलोमीट अंतराच्या आणि ६७ हजार कोटी खर्चाच्या प्रकल्पाची पायाभरणी
- वंदे भारत एक्सप्रेस – नागपूर ते बिलासपूर या दोन शहरामधील प्रवासी वाहतुकीला गतिमानतेचा आयाम देणा-या आणि ताशी १३० कि.मी. वेगाने धावणा-या रेल्वे गाडीला प्रारंभ
- नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प – नागपूर शहरातील नाग नदीला नवे जीवन देणा-या ४१ कि.मी. लांबीचा आणि १९२७ कोटी खर्चाच्या प्रकल्पाची पायाभरणी
- अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूर – राज्या वैद्यकीय क्षेत्रात नवे पर्व असणा-या आणि १५० एकर क्षेत्रातील अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज संस्था राष्ट्राला समर्पित
- नागपूर आणि अजनी रेल्वे स्टेशन पुनर्विकास प्रकल्प – नागपूर रेल्वे स्थानक पुनर्विकास प्रकल्पासाठी ५८९ कोटी आणि अजनी रेल्वेस्थानक पुनर्विकास प्रकल्पासाठी ३६० कोटी खर्चाच्या प्रकल्पाचा पायाभरणी समारंभ
- चंद्रपूर येथील सिपेट – सेंटर फॅार स्किलिंग अँड टेक्निकल सपोर्ट (सीएसटीएस) चंद्रपूरचे लोकार्पण करण्यात आले. राज्य शासनाने या संस्थेला 15 एकर जागा उपलब्ध करून दिली आहे.
- नागपूर इटारसी तिसरी मार्गिका कोहळी-नरखेड खंड राष्ट्राला समर्पित.
- अजनी येथे लोकोमोटिव्ह डेपो – अजनी येथील अत्यंत महत्वाकांक्षी अशा १२ हजार हॅार्सपॅावरच्या लोकोमोटिव्ह डेपोचे लोकार्पण
- नॅशनल इंस्टिट्यूट फॅार हेल्थ – नागपुरातील नॅशनल इंस्टिट्यूट आफ हेल्थ या संस्थेची पायाभरणी करण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातून अनेक दूर्धर आजारांवरील संशोधन होणार आहे.
- चंद्रपूर येथील सेंटर फॉर रिसर्च मॅनेजमेंट ॲन्ड कंट्रोल ऑफ हिमोग्लोबिनो पॅथीस या संस्थेचे लोकार्पण करण्यात आले.
श्री टेकडी गणेशाला वंदन !
प्रधानमंत्र्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीत केली. आजच्या संकष्टीचतुर्थीचा उल्लेख करून शहरातील श्री. टेकडी गणेशाला वंदन केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात ७५ हजार कोटी खर्चाच्या विविध कामांच्या लोकार्पण आणि शुभारंभाबद्दल त्यांनी नागपूरच्या जनतेला शुभेच्छा दिल्या.
- सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकल्या, जानेवारीत होणार निवडणुका |
- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर, केंद्र सरकारचा मोठा निर्णय |
- भोसरी विधानसभेत महेश लांडगेंची हॅट्रीक कोण रोखणार?
- तासगाव विधानसभेत महायुती डाव टाकणार, रोहित पाटलांची अडचण वाढली?
- चंदगड विधानसभेतून शिवाजी पाटील तुतारी हातात घेणार ?