Friday, April 19, 2024

मराठा उद्योजक तयार होण्यासाठी बँक ऑफ इंडियाबरोबर सामंजस्य करार – नरेंद्र अण्णासाहेब पाटील

- Advertisement -

मुंबई, दि.12 :- राज्यात एक लाख मराठा उद्योजक (Maratha Entrepreneur) तयार होण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बँक ऑफ इंडियाबरोबर सामंजस्य करार करण्यात आला आहे अशी माहिती, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी  दिली.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यासाठी व या योजनांमधून मराठा उद्योजक तयार होण्यासाठी बँक ऑफ इंडियाबरोबर आज त्यांच्या मुख्य कार्यालयात सामंजस्य करार करण्यात आला, त्यावेळी श्री. पाटील बोलत होते. यावेळी बँक ऑफ इंडियाचे जनरल मॅनेजर एस. के. रॉय, झोनल मॅनेजर एस. बी. सहानी, मुंबई साऊथ झोनचे डेप्यूटी झोनल मॅनेजर बिरेन चॅटर्जी, लीड डिस्ट्रीक्ट मॅनेजर निलेश वैती उपस्थित होते.

अध्यक्ष श्री. पाटील म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या सहकार्यातून महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त मराठा समाजाचे तरुण हे उद्योजक (Maratha Entrepreneur) झाले पाहिजे, याकरिता प्रयत्न करीत आहोत, बँकेच्या माध्यमातून व्यवसायासाठी कर्जावरचे व्याज अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून दिले जाते. बँक ऑफ इंडियाच्यावतीने मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यात बँक ऑफ इंडियाच्या शाखा आहेत, त्या शाखांच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे तरुण लाभार्थी कर्जाची मागणी करु शकतात, या कर्जाला क्रेडिट गॅरेंटी दिली जाणार आहे. क्रेडिट गॅरेंटीच्या माध्यमातून कर्ज मागणी प्रस्तावाचा सकारात्मक विचार केला जाईल. राज्यात जास्तीत जास्त मराठा समाजातील तरुण हा उद्योजक (Maratha Entrepreneur) झाला पाहिजे याकरिता राज्य शासन व महामंडळ प्रयत्न करणार असून त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही अध्यक्ष श्री.पाटील म्हणाले.

अध्यक्ष श्री. पाटील म्हणाले,  महामंडळाच्या योजनांबाबत बँक ऑफ इंडियासोबत सामंजस्य करार मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर व रायगड या जिल्ह्यातील एकूण 34 तालुक्यात लागू असेल, या सामंजस्य कराराबाबतचे अधिकृत परिपत्रक बँक ऑफ इंडिया लवकरच प्रसिद्ध करणार आहे. त्याच अनुषंगाने महामंडळाच्या संकेतस्थळावर देखील हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात येणार आहे. व्यवसायाकरिता लागणाऱ्या कर्जासंबंधी येणाऱ्या अडचणींवर मात करुन बँकेच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत योजना पोहोचविण्याकरिता हा पहिला टप्पा आहे. हा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर बँक ऑफ इंडिया हे कार्य महाराष्ट्रातील आणखी काही जिल्ह्यांकरिता करणार असल्याची माहिती अध्यक्ष श्री. पाटील यांनी दिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles