एक काळ असा होता की, काँग्रेसने निवडणुकीत दगड उभा केला, तरी लोक त्या दगडास निवडून देत होते

- Advertisement -

काँग्रेस पक्षाने पुढचा काळ प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करावे. सध्याच्या सरकारविषयी लोकांच्या मानात रोष निर्माण होतोय. बेरोजगारी, अर्थसंकट, महागाई, कोरोनामुळे पडलेल्या प्रेतांचा खच यामुळे केंद्र सरकारची लोकप्रियता घसरणीला लागली. अशा वेळी देशभरातील सर्वच प्रमुख विरोधी पक्षांनी ‘ट्विटर’च्या फांद्यांवरून उतरून मैदानात उतरणे गरजेचे आहे. पुन्हा मैदानावर उतरणे म्हणजे कोरोना काळात गर्दी करणे नाही. तर सरकारला प्रश्न विचारून भंडावून सोडणे, हे एक महत्त्वाचे काम सर्वच विरोधी पक्षांना रोज करावे लागेल. काँग्रेसने त्या कामी पुढाकार घ्यावा. सोनियांना बहुधा हाच संदेश द्यायचा असावा असं शिवसेनेने म्हटलं आहे, सामनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा देशाला मजबूत विरोधीपक्षाची गरज आहे, हे निदर्शनास आणले आहे.

सोनिया गांधी यांनी काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीत काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. विधानसभा निवडणुकीत झालेल्या काँग्रेसच्या दारुण पराभवाची गंभीर दखल घ्यावी लागेल आणि त्यातून योग्य तो धडा घेऊन पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी वस्तुस्थितीला सामोरे जावे लागेल असे त्या म्हणाल्या. सोनिया गांधी यांनी पुढे जे सांगितले ते महत्त्वाचे. पक्षात आवश्यक त्या सुधारणा कराव्या लागतील. श्रीमती गांधी या आजही काँग्रेसचे नेतृत्व करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याची दखल घ्यायलाच हवी, देशात कोरोनाचे संकट आहे. हे कारण देऊन काँग्रेस अध्यक्षपदाची निवड सलग तिसऱ्यांदा टाळण्यात आली. त्यामुळे सोनिया गांधी याच पक्षाच्या हंगामी अध्यक्षा म्हणून काम पाहत राहतील. राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडल्यापासून ते रिकामेच आहेत. पक्षाला पूर्णवेळ अध्यक्षाची गरज असल्याचे मत काँग्रेसमधील ‘जी-23’ गटाने वारंवार मांडले. पक्षाला अध्यक्ष नसल्याने लोकांसमोर कसे जायचे, हा मुद्दा या बंडखोर गटाने उपस्थित केला, पण अध्यक्ष असला नसला तरी पक्ष हा चालतच असतो. जमिनीवरचे कार्यकर्ते पक्षाचा झेंडा पुढे नेत असतात. एक काळ असा होता की, काँग्रेसने निवडणुकीत दगड उभा केला, तरी लोक त्या दगडास निवडून देत होते. आज चित्र तसे नाही. सोनिया गांधी यांनी कार्य समितीच्या बैठकीत तोच मुद्दा उपस्थित केला, असं शिवसेनेने सांगितलं आहे.

“महाराष्ट्रातले काँग्रेस पुढारी आपण ‘सामना’ वाचत नसल्याचा टेंभा मिरवतात हा त्यांचा प्रश्न, पण सोनिया गांधी ‘सामना’ ची दखल घेतात हे काल पुन्हा दिसून आले.”

काँग्रेसला आसाम, केरळमध्ये चांगली लढत देऊनही सत्तेवर का येता आले नाही? हा प्रश्न ‘सामना’ ने याच स्तंभातून विचारला. नेमका काँग्रेस कार्य समितीत श्रीमती सोनिया गांधी यांनी हाच मुद्दा उपस्थित केला. केरळ, आसामातील पराभव त्यांना टोचला व त्यांनी त्याबाबत प्रश्न उपस्थित केला. महाराष्ट्रातील जुन्याजाणत्या काँग्रेस पुढाऱ्यांनीही ‘सामना’ वाचून सोनियांपर्यंत लोकभावना पोहोचवल्या असतील तर चांगलेच आहे. प. बंगालात पक्षाला खातेही उघडता आले नाही, यावर खंत व्यक्त केली गेली. आता सोनिया गांधी यांनी खंत व्यक्त करणे व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना त्याबाबत सवाल विचारणे हा त्यांचा अधिकार आहे. सोनिया यांनी पक्षाच्या दुर्गतीवर व्यक्त केलेली चिंता व अस्वस्थता दुर्लक्षित करता येणार नाही,मानवी जीवनात वाईट पुष्कळ असते, चांगले थोडे असते.

संस्थेच्या जीवनात चांगले पुष्कळ असू शकते वाईट कमी असू शकते. व्यक्ती अगर संस्था यांच्या जीवनात जेव्हा संघर्ष उभा राहतो व त्यास तोंड देण्यासाठी जेव्हा ते सर्व सामर्थ्यानिशी उभे राहतात आणि आयुष्याची बाजी लावून लढतात, तेव्हा ते सारे मोठे होतात. दुबळे असून कसे रणधुरंधर योद्धय़ासारखे लढतात. काँग्रेस पक्ष हा स्वातंत्र्य लढय़ातून लोकांत व देशात रुजला. स्वातंत्र्य लढय़ातील संघर्षाने अनेक सामान्य कार्यकर्तेही मोठे झाले, पण त्या छोटय़ांचे नेतृत्व करणारी मंडळी थोर होती. दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, जयप्रकाश नारायण, आचार्य नरेंद्र देव, राम मनोहर लोहिया, नाना पाटील हे सर्व एके काळी काँग्रेसचे धुरंधर होते. महाराष्ट्रातील शरद पवार यांनी उभी हयात काँग्रेस पक्षात घालवली. आज अशी माणसे काँग्रेस पक्षात उरली नसतील तर त्यास जबाबदार कोण? असा सवाल शिवसेनेने केला आहे.

प. बंगालात ममता बॅनर्जी, आसामात हेमंत बिस्व सरमा, पुद्दुचेरीत एन. रंगास्वामी हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले, पण हे तिघेही माजी काँग्रेसवाले आहेत. त्यांना काँग्रेस पक्षातून बाहेर जावे लागले, पण जेथे गेले तेथे त्यांनी स्वतःचे अस्तित्व अधिक तेजोमय केले. ममता बॅनर्जी यांनी मोदी-शहांच्या बलाढय़ सत्तेशी लढा देऊन विजय प्राप्त केला. त्यांचा मूळ पिंड काँग्रेसचाच आहे. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसचा त्याग करताच प. बंगालातील काँग्रेसचा डोलाराच कोसळला. काँग्रेस म्हणजे कधीकाळी स्वातंत्र्य आणि संघर्ष होता. आज राहुल गांधींचा लढा एकाकी आहे. राहुल गांधी हे त्यांचे काम संयमाने करतात, त्यांच्यावर प्रचंड टीका घाणेरडय़ा शब्दांत होत असताना ते त्यांच्या मुद्दय़ाला धरून लढत राहतात.

कोरोना काळात श्री. राहुल गांधी यांनी घेतलेल्या अनेक मुद्दय़ांवर सरकार पक्षाकडून टीकेची झोड उठली, पण लसीकरणापासून पुढे इतर अनेक विषयांत सरकारने राहुल गांधींचीच भूमिका स्वीकारली. राहुल गांधी हेच आजही काँग्रेसचे सेनापती आहेत. त्यांचे सरकारवरील हल्ले अचूक आहेत. जगभरातून हिंदुस्थानला जी परदेशी मदत मिळू लागली आहे, त्यावर सरकारची छाती अकारण गर्वाने फुलली तेव्हा त्या फुगलेल्या छातीचा फुगा राहुल गांधी यांनी सहज फोडला. विदेशी मदतीचा गवगवा करणे म्हणजे राष्ट्राभिमान किंवा स्वाभिमान नाही, असे ते म्हणाले व त्यावर राष्ट्रीय मंथन झाले,असे सामना मधून म्हंटले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles