पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मे आणि जून महिन्यामध्ये मोफत धान्य वाटप केले जाणार आहे.
मागील वर्षी कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी देशात लॉकडाऊन जाहीर केला होता. या काळात मजूर लोकांचे प्रचंड हाल झाले. अनेकांना आपल्या गावाकडे स्थलांतर करावे लागले. अनेकांनी आपल्या घरी जाण्यासाठी 400 ते 500 किलोमीटर अंतर कोणत्याही सुविधेशिवाय पायी चालून पार केल्याचं पाहायला मिळालं. सर्व व्यवहार ठप्प झाले. त्यामुळे लोकांच्या उदरनिर्वाहाचे साधन बंद झाले. अशावेळी मदत म्हणून केंद्र सरकारकडून मोफत अन्नधान्य पुरवण्यात आले होते.
त्यामुळे कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गंत कोट्यवधी लोकांना 5 किलो धान्य मोफतमध्ये दिले जाणार आहे. महामारीमुळे संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे देशात बहुतांश नागरिकांच्या रोजगारावर परिणाम पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवाय गरीब लोकांना याकाळात आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. त्यामुळे याच योजनेंतर्गत देशातील 80 कोटी लोकांना केंद्र सरकारकडून मोफत धान्य मिळणार आहे. या वर्षीच्या मे आणि जून अशा एकूण दोन महिन्यांमध्ये लाभार्त्यांना 5 किलो धान्य मोफत मिळणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने एकूण 26 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
ताज्या बातम्यासाठी Email Subscribe करा.
देशात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. रोज लाखोंच्या संख्येने नवे रुग्ण आढळत आहेत. सध्या रुग्णांचा आलेख वरच जाताना दिसतोय. याच कारणामुळे देशात अनेक राज्यांना नाईट कर्फ्यू किंवा लॉकडाऊन लागू केला आहे. त्यामुळे रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता केंद्र सरकार पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करु शकतं असं अनेकांना वाटत आहे. परिणामी स्थलांतराचे प्रमाण वाढले आहे.