लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसला आहे. महायुतीच्या अनेक मोठ्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीने अनेक उमेदवार निवडून आणले. महाराष्ट्रात आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या हालचालीने राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज दि. 2 सप्टेंबर रोजी चार दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यासाठी कोल्हापूरमध्ये आहेत. शरद पवार यांनी राज्यात भाजपला मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील फुट आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचा हा दौरा आहे. कोल्हापुरात शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे (Samarjeet Ghatge) यांना आपल्या सोबत घेत कमळ सोडून तुतारी हातात देणार आहेत. समरजित घाटगे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. समरजित घाटगे यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपला रामराम केला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. 3 सप्टेंबर रोजी कागलमध्ये गैबी चौकामध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत समरजित घाटगे तुतारी फुंकणार आहेत.कागलमध्ये सायंकाळी गैबी चौकात शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार आहेत. आगामी कागल विधानसभा (kagal assembly) निवडणुकीसाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश निश्चित झाल्यानंतर समरजित घाटगे यांनी जिल्ह्यातील महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या भेटी-गाठी सुरु केल्या आहेत.समरजित घाटगे यांनी कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांची भेट घेतली. तसेच समरजित घाटगे यांनी कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज यांचीही भेट घेत चर्चा केली होती. आगामी कागल विधानसभा निवडणुकीसाठी सतेज पाटील यांची मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.