पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर २५ फेब्रुवारी रोजी २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडे याला ७२ तासांनंतर अटक करण्यात आली. शुक्रवारी संध्याकाळी त्याला कोर्टात हजर करण्यात आले, जिथे पोलिसांनी १४ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. मात्र, आरोपीच्या वकिलांनी दावा केला की, “मुलगी स्वतःहून बसमध्ये गेली होती आणि दोघांच्या सहमतीने हे संबंध झाले आहेत.” सरकारी वकिलांनी हा दावा फेटाळून लावला आणि कोर्टाने आरोपीला १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
आरोपीच्या वकिलांचे म्हणणे:
वकील वजीदखान बीडकर आणि साजिद खान यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, “मुलगी स्वतःहून बसमध्ये गेली होती आणि दोघांच्या सहमतीने हे सर्व घडले आहे. त्यामुळे आरोपीला जास्तीत जास्त दोन दिवसांची कोठडी द्यावी.” तसेच, त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, “आरोपीचे फोटो माध्यमांमध्ये आले आहेत, मग बुरखा घालून आरोपीला कोर्टात का आणले गेले?”
सरकारी वकिलांचे प्रतिवाद:
सरकारी वकिलांनी या दाव्याला विरोध करताना कोर्टात सांगितले की, “आरोपीने फिर्यादीला ‘ताई’ म्हणत फसवले आणि बसमध्ये नेले. आरोपीवर आधीच ६ गुन्हे दाखल आहेत, ज्यापैकी ५ प्रकरणांमध्ये महिला फिर्यादी आहेत. यावरून आरोपीचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट होतो.”
१४ दिवसांच्या कोठडीची मागणी:
सरकारी पक्षाने पुढे म्हटले की, “आरोपीने आणखी असे गुन्हे केले आहेत का, याचा तपास करायचा आहे. गुन्हा केल्यानंतर तो कोणाच्या संपर्कात होता, हे शोधणे आवश्यक आहे. तसेच, गुन्हा करताना आरोपीकडे मोबाईल होता, त्याचा तपास करायचा आहे. त्यामुळे आरोपीला १४ दिवसांची पोलीस कोठडी मिळावी.”