भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांचा मुलगा संकेत बावनकुळे याच्या ऑडी कारने नागपूरमधील (Nagpur Hit & run Case) रामदास पेठेत रविवारी मध्यरात्री भरधाव वेगाने एका दुचाकीसह चार वाहनांना धडक दिली. मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास एमएच ४०-सीवाय-४०४० या क्रमांकाच्या ऑडी कार रामदासपेठकडे आली त्यावेळी या ऑडी कारने जितेंद्र सोनकांबळे यांच्या एमएच-३१-ईके-३९३९ या क्रमांकाच्या कारला धडक दिली यापूर्वी या ऑडी कारने एमएच-४९-झेड-८६३७ या क्रमांकाच्या कारला धडक दिली होती. तसेच आणखी दोन दुचाकीस्वार तरुण सुद्धा जखमी झाले आहेत.
याप्रकरणी चालकासह दोघांना अटक करण्यात आली आहे या कारची नोंद भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत यांच्या नावे आहे. सुदैवाने या अपघातामध्ये जीवित हानी झाली नसली तरी गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या घटनेला राजकीय वळण लागल्याचे दिसते. या घटनेच्या विरोधात जितेंद्र सोनकांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीताबर्डी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अर्जुन हावरे आणि रोनित चिंतमवार या दोघांना अटक करण्यात आले आहे.
नागपूरमध्ये झालेल्या अपघातात (Nagpur Accident) चंद्रशेखर बावनकुळे यांचे सुपुत्र संकेत बावनकुळे (Sanket Bavankule) यांच्या नावावर ही गाडी असल्याने सोशल मीडियावर हा अपघात वायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. अपघात झाला त्यावेळेस संकेत बावनकुळे हे गाडीत नव्हते त्यांचा चालक अर्जुन हावरे आणि त्याचे मित्र रोहित चिंतमवार हे दोघे कार मध्ये होते अशी माहिती सीताबर्डी पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांनी दिली. या कारची नंबर प्लेट नव्हती त्यामुळे या गाडीची नंबर प्लेट अपघातानंतर पडली की काढली गेली यावरून अनेक प्रश्न उपस्थित होतात.
चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सुपुत्राच्या नावावर ही गाडी असल्याने या घटनेला एक राजकीय वळण लागले आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे माध्यमांशी बोलताना म्हणाले, सर्वांसाठी न्याय एकसारखा असावा व दोषींवर कारवाई व्हावी. या अपघात प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी पूर्ण चौकशी करावी, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून या घटनेची सखोल चौकशी करावी आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे.