नागपूर जिल्हयात आतापर्यंत 4 लाख 65 हजारपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 8621 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. इतकी भयावह स्थिती असताना जिल्ह्यातील खुर्सापार (Maharashtra Khursapar village) गावानं कोरोनाशी दोन (Covid 19) हात करत चांगला लढा दिला आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने कोव्हिडशी चांगल्याप्रकारे लढा देणाऱ्या खुर्सापार ग्रामपंचायतींच्या कामाची दखल घेतलीय.
केंद्राच्या पंचायतराज (Ministry of Panchayati Raj) विभागाच्यावतीने प्रकाशित ‘बेस्ट प्रॅक्टिसेस टू फाईट कोव्हिड-19 बाय पंचायत ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तिकेत महाराष्ट्रातील सहा ग्रामपंचायतीची नोंद केली आहे. यामध्ये नागपूरमधील खुर्सापार, चंद्रपुरातील चंदनखेडा, पालघरमधील उंबरापाडा सफाळे, नगर जिल्ह्यातील भोयरे खुर्द आणि हिवरे बाजार तर नांदेड जिल्ह्यातील भोसी यांचा समावेश आहे.
कसा आहे खुर्सापार पॅटर्न?
नागपूर जिल्ह्यातील खुर्सापार जेमतेम 1400 लोकवस्तीचं गाव, कोरोनाच्या पहिल्या लाटेत नागपूरसह अवघ्या महाराष्ट्राची अवस्था या गावानं बघितली. तेव्हापासूनच या गावानं कोरोनाशी लढा देण्याचा निर्धार केला. 24 मार्च 2020 पासूनच खुर्सापार ग्रामपंचायतीने कोरोनाविषयी शासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन सुरु केलं. आणि कोरोनाशी लढा देण्यासाठी खुर्सापार पॅटर्न राबवायला सुरुवात झाली.
केंद्र सरकारने कोव्हिडशी चांगल्याप्रकारे लढा देणाऱ्या खुर्सापार ग्रामपंचायतींच्या कामाची दखल घेतली. केंद्राच्या पंचायतराज विभागाच्यावतीने प्रकाशित ‘बेस्ट प्रॅक्टिसेस टू फाईट कोव्हिड-19 बाय पंचायत ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तिकेत खुर्सापार गावाचा उल्लेख आहे. असा हा खुर्सापार पॅटर्न नेमका आहे तरी काय? यावर नजर टाकूया
खुर्सापार पॅटर्न काय आहे?
– 24 मार्च 2020 पासूनच उपाययोजना राबवण्यास सुरुवात
– सरकारी सूचनांचं काटेकोरपणे पालन
– युवकांची वार्डनिहाय कोव्हिडयोद्धा म्हणून नियुक्ती
– शासकीय आणि सार्वजनिक इमारतींना सॅनिटायझर सेन्सॉर मशीन लावल्या
– कोरोना नियम मोडणाऱ्यांवर सीसीटीव्हीचा वॅाच
– चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावले
– बाहेरील लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी होमगार्ड
– सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधने
– लाऊडस्पीकरद्वारे कोरोनाविषयी जनजागृती
– गावात सोशल डिस्टन्सिंगचे पालन, मास्क अनिवार्य
– दर महिन्यात क्लोरिन फवारणी आणि धुरळणी
– गावात ठिकठिकाणी वॅाशबेसीन
– विलीगीकरण केंद्र
कोरोनाशी लढा देण्यात खुर्सापार गावातील कोरोना योध्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
खुर्सापार गावाने कोरोनाशी लढा दिला, यात गावातील आरोग्य केंद्राचीही महत्त्वाची भूमिका आहे. शिवाय आशा वर्कर यांनी घराघरात जावून जनजागृती केली. गावातील शाळेत विलीगीकरण केंद्र तयार केलंय, पण कोरोनाशी चांगला लढा दिल्याने गावातील विलीगीकरण केंद्रात आतापर्यंत एकाही रुग्णाला ठेवण्याची वेळ आली नाही.