२ डिसेंबरला नियोजित संयुक्त चाळणी परीक्षा – २०२२ प्रवेश प्रमाणपत्र एमपीएससीच्या संकेतस्थळावर उपलब्ध

मुंबई, दि. २६ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शुक्रवार, दिनांक ०२ डिसेंबर २०२२ रोजी नियोजित विविध विभागातील प्रशासकीय अधिकारी, सहायक प्रशासकीय अधिकारी व सहायक प्रशासन अधिकारी या सहा संवर्गाच्या संगणक प्रणालीवर आधारित संयुक्त चाळणी परीक्षेकरीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन  अर्जप्रणालीच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावरील त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोडकरुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.

परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन, उमेदवारांनी परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे तसेच, प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वतःच्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य राहणार आहे.

परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा यासंदर्भात आयोगाची (MPSC) कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही.

आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचना प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचना, परीक्षेच्या वेळी शारीरिक, परस्पर अंतराच्या (Social Distancing) अनुषंगाने करावयाची कार्यवाही, उपाययोजना संदर्भातील सूचनांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे. सदर सूचनांचे उल्लंघन करणा-या उमेदवारांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच, प्रचलित नियम, कायद्यातील तरतुदीनुसारही कारवाई करण्यात येईल.

प्रवेशप्रमाणपत्र मिळण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास उमेदवारास आयोगाच्या contact- secretary@mpsc.gov.in व support-online@mpsc.gov.in या ईमेल व / अथवा १८००- १२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या दूरध्वनी क्रमांकावरुन विहित वेळेत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल.

संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षांकरीता उमेदवारांना सराव करता यावा यासाठी आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ‘ONLINE FACILITIES’ या मेनूमध्ये ‘Computer Based Examinations>Mock Test’ येथे एक वेबलिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर मॉकटेस्ट ही केवळ सरावासाठी असून प्रत्यक्ष परीक्षेचा कालावधी व गुण संबंधित परीक्षेच्या परीक्षा योजना व अभ्यासक्रमानुसार असेल, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सह सचिव, (दक्षता, धोरण व संशोधन ) यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविले आहे.

vishal  के बारे में
vishal The live janmat is a Marathi digital News web portal. We aim to report the latest news, views, and entertainment. We seek to look at policies and decision-making from the perspective of people. Read More
For Feedback - livejanmt@gmail.com