Sunday, July 14, 2024

लम्पी चर्मरोग : राज्य शासनाच्या उपाययोजना|Lumpy Virus

- Advertisement -

राज्यासह देशात अनेक दिवसांपासून पशुधनाला लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. लम्पी चर्मरोगाबाबत(Lumpy skin disease) समाज माध्यमांमधून काही अफवा पसरविल्या जात आहेत. राज्य शासनाने अनेक प्रकारच्या उपाययोजना केलेल्या आहेत. पशुपालकांना शासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती व्हावी, त्यांचे गैरसमज, अंधश्रद्धा दूर करण्यासाठीचा लेख.

लम्पी चर्मरोग(Lumpy skin disease) हा केवळ गोवंश वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. हा रोग कीटकांपासून पसरतो. हा आजार गाई व बैलांपासून किंवा गाईच्या दुधापासून मानवामध्ये संक्रमित होऊ शकत नाही. शासनाने राज्यातील प्रत्येक पशुवैद्यकीय संस्थेच्या कार्यक्षेत्रातील भागात सरसकट लसीकरण करण्यासाठी परवानगी दिली आहे. लम्पी चर्मरोग राज्य शासनाने केलेल्या प्रभावी उपाययोजनेमुळे घटत आहे. राज्यात सध्या बाधित पशुधनापैकी 50 टक्के पशुधन उपचाराने बरे झाले आहे. संपूर्ण राज्यात लम्पी आजाराबाबत दक्षतेचा इशारा प्रशासनाला दिला आहे. राज्यातील 31 जिल्ह्यांत या आजाराचा पशुधनात शिरकाव झाला आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात आपण वेळीच खबरदारी व उपाययोजना सुरु केल्याने लम्पी आजार नियंत्रणात आहे. पशुपालकांनी, शेतकऱ्यांनी घाबरून न जाता शासनाच्या सूचनाप्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

पशुधन पर्यवेक्षकांची पदे भरणार, जनावरे गमावणाऱ्या पशुपालकांना अर्थसहाय्य.

लम्पी चर्मरोगावर नियंत्रण करण्याकरिता पशुधन पर्यवेक्षकाची 286 रिक्त पदे आणि जिल्हा परिषद स्तरावरील पशुधन पर्यवेक्षकाची 873 अशी 1159 पदे बाह्यस्रोताद्वारे भरण्यात येणार आहे. लम्पी आजारामूळे ज्या पशुपालकांनी आपली जनावरे गमावली आहेत त्यांच्यासाठी शासनातर्फे अर्थसहाय्य केले जात आहे. यात दुभत्या गायीसाठी 30 हजार रुपये, शेतात काम करणाऱ्या बैलासाठी 25 हजार रुपये, लहान कारवडी असल्यास 16 हजार रुपये मदत दिली जात आहे. या व्यतिरिक्त जिल्हा परिषदेलाही सानुग्रह अनुदान देण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.

अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई

शासनाने सर्व पशुपालकांना आवाहन केले आहे की, लम्पी चर्मरोग आजार केवळ गाई व बैलांना होत असून त्याचा मानवी आरोग्याला कोणताही धोका संभवत नाही. या रोगाबाबत समाज माध्यमांमधून काही अफवा पसरविली जात असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.  हा रोग माशा, डास, गोचिड इ. कीटकांमार्फत पसरत असल्याने या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ग्रामपंचायत व नगर परिषद अधिकाऱ्यांनी कीटनाशकांची फवारणी करावी आणि सर्व पशुपालकांमध्ये जनजागृती करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्हा नियोजन समितीमार्फत प्रत्येक जिल्ह्यासाठी 1 कोटींचा निधी

लम्पी चर्मरोगावर(Lumpy skin disease) उपयुक्त असणाऱ्या औषधींच्या उपलब्धतेसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत प्रत्येक जिल्हयासाठी 1 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीमधून लम्पी चर्मरोगावरील नियंत्रणात्मक लसीकरणासाठी खाजगी पशुवैद्यकीय व्यावसायिक, सेवादाता (व्हॅक्सीनेटर्स) व पशुवैद्यकीय महाविद्यालयातील आंतरवासिता छात्र (ईंटर्नीज) यांना 5 रुपये प्रति लसमात्राप्रमाणे मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

म्हशींच्या वाहतुकीसाठी आरोग्य प्रमाणपत्र

म्हशींची नियमित आरोग्य प्रमाणपत्रासह संक्रमित नसलेल्या क्षेत्रातून (घोषित एपी-सेंटर व्यतिरिक्तचे क्षेत्र) वाहतूक केली जाऊ शकते. आरोग्य प्रमाणपत्र जारी करण्यासाठी  राज्य शासनाच्या, जिल्हा परिषदेकडील पशुसंवर्धन विभागातील पशुधन विकास अधिकारी (गट-अ) पेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकाऱ्यास प्राधिकृत करण्यात आले आहे. या आदेशानुसार म्हशींची वाहतूक करताना विहित प्रपत्रातील आरोग्य दाखला तसेच जनावरांची वाहतूक अधिनियम, 2001 मधील नियम 47 अन्वये स्वास्थ्य प्रमाणपत्र/पीसीआर चाचणीचा नकारार्थी अहवाल सोबत बाळगणे आवश्यक आहे.

रोगाची लक्षणे आढळून आल्यास कळविणे बंधनकारक

प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम, 2009 मधील कलम ४(१) नुसार पशुमध्ये या रोगाची लक्षणे आढळून आल्यास प्रत्येक व्यक्ती, अशासकीय संस्था, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांनी सदरची माहिती नजिकच्या पशुवैद्यकीय संस्थेस कळविणे बंधनकारक आहे. गावस्तरावरून अशी माहिती संबंधित ग्रामसेवक आणि सरपंचांनी न चुकता जवळच्या पशुवैद्यकीय दवाखाना/तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयास कळवावी. लम्पी चर्मरोगाची लक्षणे दिसल्यास, जवळच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखाने/ पशुधन विकास अधिकाऱ्यांना माहिती देऊन मोफत उपचार करून घेण्याचे पशुपालकांना आवाहन करण्यात आले आहे. लम्पी चर्मरोग हा  पशुधनातील जरी वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला, तरी त्वरित उपचार सुरू केल्यास तो निश्चितपणे बरा होतो.

विलंबाने उपचार केल्याने बहुतांश मृत्यू

पशुपालकांनी भीती बाळगण्याचे कारण नसले, तरी त्यांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. पशुधनाचे बहुतांश मृत्यू हे संबंधित आजारी पशुधनावर तीन ते चार दिवसांपेक्षा अधिक कालावधी लोटल्यानंतर उपचारास सुरुवात झाल्यामुळे झाले आहेत. लम्पी रोगाचा उपचार लक्षणे दिसल्यानंतर वेळेतच सुरू झाल्यास, मृत्यूची शक्यता अत्यंत कमी असून बहुतांश पशू उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. सर्व पशुपालकांनी लम्पी चर्मरोगाच्या संभाव्य लक्षणांकडे बारकाईने लक्ष ठेवावे व त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.

शासनाकडून मोफत लस, उपचारावर बंदी नाही

सर्व खासगी पशुवैद्यकीय व्यावसायिकांनी, सेवादात्यांनी तसेच पशुसंवर्धन विभागातील आणि महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी स्वयंप्रेरणेने लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदवावा. यासाठी त्यांनी संबंधित जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयाशी संपर्क करावा. शासनाने खाजगी पशुवैद्यकांना लम्पी चर्मरोगाचा उपचार करण्यासाठी कोणतीही बंदी घातलेली नाही. शासकीय आणि खाजगी पशुवैद्यकांनी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने दि. 24 सप्टेंबर 2022रोजी दिलेल्या सुधारित उपचार प्रोटोकॉल प्रमाणे उपचार करावेत. शासकीय अधिकाऱ्यांनी पशुपालकांकडे जाऊन औषधोपचार व लसीकरण करावे. शासनाकडून मोफत औषधोपचार व लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे.

शासकीय अधिकाऱ्यांनी पशुपालकांकडे जाऊन औषधोपचार व लसीकरण करावे. शासनाकडून मोफत औषधोपचार व लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. तरी याबाबत तक्रार असल्यास संबंधितांवर सक्त कारवाई करण्यात येणार आहे. पशुपालकांनी अशी तक्रार विभागाच्या टोल फ्री क्र.१८००-२३३०-४१८ वर अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर मधील पशुसेवेच्या टोल फ्री क्र.१९६२ वर नोंदविण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त श्री. सिंह यांनी केले आहे.

भारत हा जगातील साखरेचा सर्वात मोठा उत्पादक देश

लम्पी बाधित जनावरे आढळत आहेत त्या गावाच्या 5 किलोमीटर परिघात लसीकरण

ज्या जनावरांना लम्पी (Lumpy skin disease) आजार झाला आहे, अशा जनावरांना बाजूला ठेवून त्यावर औषधोपचार तात्काळ सुरु केले पाहिजे. पशुसंवर्धन विभागाकडे मुबलक प्रमाणात औषधे व लसीची मात्रा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना, पशुपालकांना लम्पी आजार लसीकरण दृष्टीकोनातून काही कमी पडू दिले जाणार नाही. सध्या ज्या गावात लम्पी बाधित जनावरे आढळत आहेत त्या गावाच्या 5 किलोमीटर परिघापर्यंत असलेल्या गावात प्राधान्याने लसीकरण केले जात आहे. 5 किलोमीटर असलेली मर्यादा वाढविण्यासाठी प्रयत्न करुन इतर गावातही लसीकरण वाढविण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.  

Lumpy skin disease

मुंबई शहरातील जवळपास सर्व गोवर्गीय जनावरांचे लसीकरण पूर्ण

मुंबई शहरातील जवळपास सर्व गोवर्गीय जनावरांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे. या उपरही पशुपालकांची जनावरे लसीकरण करण्याची राहून गेली असल्यास त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचा आपत्कालीन संपर्क क्रमांक 1916,  022-25563284, 022 – 25563285 व राज्य शासनाचा पशुवैद्यकीय सेवा संपर्क क्रमांक 1962 यावर संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात सुमारे 75.49 टक्के गोवंशीय पशुधनाचे लसीकरण

जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज दि. 3.10.2022 रोजी 6 लक्ष लस प्राप्त झाल्या आहेत. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांच्या आकडेवारी नुसार महाराष्ट्रात सुमारे 75.49 टक्के गोवंशीय पशुधनाला लसीकरण झाले आहे.

५० टक्के पशुधन उपचाराने बरे

राज्यामध्ये दि. ३ ऑक्टोबर २०२२ अखेर ३१ जिल्ह्यांमधील एकूण 2151 गावांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण 48,954 बाधित पशुधनापैकी एकूण 24,797 म्हणजे 50 टक्के पशुधन उपचाराने बरे झाले असल्याची माहिती विभागाने दिली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles