कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यानुसार 22 एप्रिल रात्री 8 वाजल्यापासून 1 मेपर्यंत राज्यातील निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. अत्यावश्यक कारणांशिवाय आंतरजिल्हा प्रवासाला मनाई करण्यात आली आहे. आंतरजिल्हा प्रवास करायचा असेल तर त्यासाठी ई-पास काढणं बंधनकारक करण्यात आलं आहे. राज्यात जिल्हाबंदीही लागू असेल. म्हणजेच नागरिकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवेश करता येणार नाही. फक्त अत्यावश्यक कारणासाठीच प्रवासाची परवानगी नागरिकांना असेल आणि त्यासाठी ई-पास घ्यावा लागेल, असं पोलिसांनी म्हटलं आहे.
ई-पास कसा काढायचा?
- जिल्हा किंवा पोलीस आयुक्तालय निवडा.
- तुमचे संपूर् नाव नोंद करा.
- प्रवास कोणत्या तारखेपासून ते किती तारखेपर्यंत करणार ते नमूद करा.
- मोबाईल नंबर आणि प्रवासाचे कारण आणि प्रवासाचा उद्देश सविस्तर पणे नोंद करा.
- वाहनाचा प्रकार, वाहनाचा नोंदणी क्रमांक, सध्याचा पत्ता आणि ई-मेल नोंद करा.
- प्रवास जिथून करणार ते ठिकाण, प्रवासाचे अंतिम ठिकाण, सहप्रवासी संख्या नमूद करा.
- आपण कटेंन्टमेंट झोनमधील आहात का? याविषयी माहिती सादर करा.
- परतीचा प्रवास याच मार्गानं करणार का हे नमूद करा.
- 200 केबी पेक्षा लहान साईजचा फोटो अपलोड करा आणि सर्व माहिती चेक करुन अर्ज सादर करा.
ई-पास मंजूर करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागाचे उपायुक्त यांच्याकडे असेल. वैयक्तिक किंवा व्यक्तींचा समूह अर्ज करु शकतो. सर्व आवश्यक कागदपत्रे वेबसाईटवर अपलोड करा. अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला टोकन आयडी मिळेल. टोकन क्रमांक सेव्ह करुन ठेवा. ई-पास अर्ज मंजूर झाल्यानंतर टोकन आयडीद्वारे तो डाऊनलोड करुन ठेवा.ई-पाससाठी https://covid19.mhpolice.in/ या वेबसाईटवर अर्ज केल्यानंतर संबंधित कार्यालयाकडून मंजुरी देण्यात आल्यानंतर टोकन क्रमांक नोंदवून ई-पास पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करा.