आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने जोरदार तयारी सुरू केली असून, त्याचाच भाग म्हणून आज भाजपच्या कोल्हापूर जिल्हा कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उत्साहात पार पडल्या. पक्षाकडे आलेल्या विक्रमी प्रतिसादामुळे भाजपची शहरातील वाढती ताकद आणि जनतेचा विश्वास स्पष्टपणे दिसून आला.
या मुलाखती खासदार श्री. धनंजय महाडिक, प्रदेश सचिव श्री. महेश जाधव आणि जिल्हाध्यक्ष श्री. विजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या. महापालिका निवडणुकीसाठी तब्बल ३०० हून अधिक इच्छुक उमेदवारांनी उमेदवारीची मागणी केल्याने भाजपमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
मुलाखतीदरम्यान प्रत्येक इच्छुक उमेदवाराची वैयक्तिक ओळख, संबंधित प्रभागातील सद्यस्थिती, सामाजिक काम, संघटनात्मक अनुभव आणि राजकीय वाटचाल यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पक्षाने नेहमीच पारदर्शक प्रक्रिया आणि सक्षम नेतृत्वाला प्राधान्य दिले असून, याच निकषांवर उमेदवारांची निवड केली जाणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या संपूर्ण प्रक्रियेचा सविस्तर अहवाल लवकरच प्रदेश कार्यालयाकडे सादर केला जाणार असून, त्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील उमेदवारी वाटपाबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत.
मुलाखतींच्या वेळी शहरातील अनेक नामवंत व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनीही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थिती लावली होती. त्यामुळे संपूर्ण वातावरणात उत्साह, चैतन्य आणि सकारात्मकतेची लाट जाणवत होती.
मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण यांच्या सक्षम नेतृत्वाखाली भाजपचे संघटन कार्य वेगाने पुढे जात असून, प्रत्येक कार्यकर्ता आणि इच्छुक उमेदवाराच्या पाठीशी पक्ष ठामपणे उभा आहे. या मुलाखतींमधून इच्छुक उमेदवारांचे सखोल मूल्यांकन व सर्वेक्षण केले जाणार असून, त्यानंतरच कोल्हापूर शहराच्या विकासाला गती देणाऱ्या उमेदवारांवर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.




