Silk Business|रोजगाराचा नवा मार्ग रेशीम व्यवसाय

- Advertisement -

रेशीम शेती उद्योग (silk business) हा कृषीवर आधारित रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला व ग्रामीण भागातील लोकांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी मदत करणारा उद्योग आहे. महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती व हवामान रेशीम शेती उद्योगास पुरक असून वातावरणाच्या लहरीपणामुळे शेतीमध्ये होणारे नुकसान टाळण्यासाठी या उद्योगाची हमखास मदत होणार आहे. रोजगाराचा नवा मार्ग म्हणून रेशीम व्यवसायाकडे पाहता येणार आहे.

राज्यात रेशीम शेती व संलग्न उद्योगाला शासकीय पाठबळ मिळावे म्हणून महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योग खात्याअंतर्गत रेशीम संचालनालयाची स्थापना करण्यात आली आहे.  राज्यात रेशीम उद्योग तुती रेशीम व टसर (वन्य) रेशीम या दोन भागात विभागलेला असून अशा या वैशिष्टयपूर्ण उद्योगात महाराष्ट्र राज्य हे अपारंपारिक राज्यामध्ये आघाडीवर आहे. त्याची पावती म्हणून 9 फेब्रुवारी 2019 रोजी नवीन दिल्ली येथे झालेल्या समारंभात केंद्र शासनाचा रेशीम उद्योगात उदयोन्मुख अपारंपारिक राज्याचे पारितोषिक राज्याला प्रदान करण्यात आले. silk business

राज्यात पुणे विभाग, औरंगाबाद, अमरावती व नागपूर विभागात एकूण 24 जिल्ह्यात तुती रेशमाचे उत्पादन घेतले जाते. नागपूर विभागात नागपूर व वर्धा जिल्ह्यातील जमीन व वातावरण पोषक असल्याने तेथे प्रामुख्याने तुती लागवड केली जाते. आता रेशीम कोषाला कृषी पिकाचा दर्जा शासनाने प्रदान केला असून त्यामुळे रेशीम शेतीला शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळणे शक्य होणार आहे.

उच्च दर्जाच्या वस्त्रांमध्ये रेशीम वस्त्रांचा समावेश होतो. कथा – पुराणांमध्येही रेशमी वस्त्रांचा उल्लेख आहे. काही हजार वर्षांपासून भारतात रेशमी वस्त्रांचा वापर होतो. इसवी सनाच्या आधी चीनमध्ये रेशमाचा वापर सुरू झाला, असा उल्लेख आहे. नंतर तो भारतात आला. भारतातील रेशीम उद्योगात महाराष्ट्राचे स्थान महत्त्वाचे आहे, त्यातही विदर्भाचा वाटा मोठा आहे. एवढेच नाही विदर्भातील ‘टसर रेशीम’ने रेशीमच्या बाजारात स्थान निर्माण केले आहे. यात रेशीम संचालनालय नागपूरचा वाटा महत्त्वाचा आहे. या रेशीम संचालनालयाची स्थापना 1 सप्टेंबर 1997 रोजी झाली होती.silk business

रेशीम उत्पादनात जगात चीनचा प्रथम तर भारताचा दुसरा क्रमांक आहे. रेशीमच्या बाजारात महाराष्ट्राच्या टसर रेशीम पैठणीला मोठी मागणी आहे. विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील मोहाडी परिसरात टसर आणि तुतीच्या रेशीम कापड आणि धाग्याची निर्मिती होते. टसर रेशीमच्या ‘कर्वती साडी’चा इतिहास सुमारे 400 वर्षे जुना आहे. आंधळगाव येथे कर्वती साडी विणण्याचा उद्योग पारंपरिक आहे.

टसर रेशीम उद्योग प्रामुख्याने पूर्व विदर्भातील भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या चार जिल्ह्यात होतो. ‘ऐन’ आणि ‘अर्जुन’ वृक्ष असलेल्या वन क्षेत्रात आदिवासी टसर रेशीमचे उत्पादन घेतात.

महाराष्ट्र राज्य ग्रामोद्योग महामंडळामार्फत पाचगणी येथे रेशीम संशोधन केंद्र सुरू झाल्यानंतर (1956) संशोधन करून सातारा व पुणे विभागातील जिल्हयांमध्ये तुतीची लागवड करून कोषांचे उत्पादन सुरू करण्यात आले. 1970 पासून शेतकरी व्यवसाय म्हणून रेशीम शेती करू लागलेत. रेशीम शेती हा शेतीला पूरक जोडधंदा होऊ शकतो हे लक्षात आल्याने, रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी 1 सप्टेंबर 1997 रोजी रेशीम संचालनालय स्थापन करण्यात आले. संचालनालयाचे पहिले स्वतंत्र कार्यालय नागपूर येथे सुरू करण्यात आले.

जिल्हा उद्योग केंद्र, महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ, मुंबई आणि विदर्भ विकास महामंडळामार्फत ‘रेशीम शेती उद्योग योजना’ राबविली जात होती. यात विदर्भ विकास महामंडळ ‘टसर रेशीम उद्योग योजना’ राबवत होते. रेशीम उदयोगाची राज्यात मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसिद्धी व्हावी व त्याद्वारे राज्यातील रेशीम उद्योगात वाढ होण्यासाठी महारेशीम अभियान 2017 पासून राबविण्यात येत आहे. या अभियानास शेतक-यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला आहे.   रेशीम उद्योगामध्ये आर्थिक लाभ आणि रोजगार निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात वाव असून शेतक-यांना या उद्योगात येण्याची गरज आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles