Friday, September 13, 2024

राज्यात डिसेंबरपर्यंत पोलीस भरती करणार –गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

- Advertisement -

डिसेंबरपर्यंत राज्यात सुमारे 5 हजार पेालिसांची भरती करण्यात येईल. त्यानंतरच्या टप्प्यात सुमारे 7 हजार पोलिसांची भरती करण्यात येईल अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. औरंगाबाद पोलीस परिक्षेत्रांतर्गत कायदा व सुव्यवस्था अंमलबजावणीबाबत झालेल्या आढावा बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील बोलत होते.  यावेळी त्यांनी कायदा सुव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी गुन्हे सिध्दतेचे प्रमाण वाढवण्याचे निर्देश दिले.

औरंगाबाद पोलीस परिक्षेत्रांतर्गत कायदा व सुव्यवस्था अंमलबजावणीबाबत झालेल्या आढावा बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील बोलत होते. यावेळी पोलीस महासंचालक संजय पांडे, विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम.एम.प्रसन्ना, पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, पोलीस अधीक्षक श्रीमती मोक्षदा पाटील तसेच बीड, उस्मानाबाद आणि जालना जिल्हा पोलीस अधीक्षक उपस्थित होते. बैठकीच्या सुरूवातीला श्री. प्रसन्ना यांनी सादरीकरणाव्दारे गृहमंत्र्यांना परीक्षेत्रातील सविस्तर माहिती दिली.

पुढे बोलतांना गृहमंत्री म्हणाले की, औरंगाबाद परिक्षेत्रातील गुन्ह्यांचे प्रमाण अधिक असल्याने पोलिसांनी अधिक सक्षमपणे तपास करणे गरजेचे आहे. पोलीस दलात कर्मचारी हा घटक महत्त्वाचा असून त्याची तपासात देखील भूमिका महत्त्वाची आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणुन घ्या आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य द्या. लोकप्रतिनिधींच्या बाबतीत असणारा राजशिष्टाचार प्राधान्याने पाळा. डिसेंबरपर्यंत राज्यात सुमारे 5 हजार पेालिसांची भरती करण्यात येईल. त्यानंतरच्या टप्प्यात सुमारे 7 हजार पोलिसांची भरती करण्यात येईल. पोलीस सेवेत कर्मचारी दाखल झाल्यानंतर संबंधित कर्मचारी किमान पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवानिवृत्त व्हावा, त्यादृष्टीने योजना बनविण्यात येत आहे. जिल्ह्यांमध्ये पोलीस दल अधिक सक्षम बनविण्यासाठी जिल्हा वार्षिक निधीतुन निधीची मागणी करा. कोरोना काळात पोलीस दलाने कौतुकास्पद कामगिरी केल्याचेही गृहमंत्री म्हणाले.

बैठकी दरम्यान उपस्थित पोलीस अधिक्षकांनी आपआपल्या जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची माहिती गृहमंत्र्यांना दिली. गृहमंत्र्यांनी बैठकीपूर्वी आयुक्तालयातील सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाला भेट दिली. बैठकीमध्ये विविध पुस्तिकांचे विमोचन गृहमंत्र्यांच्याहस्ते करण्यात आले.

सायबर, आर्थिक गुन्हेगारीचा बिमोड करावा – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

तंत्रज्ञानाचा गैरवापर करुन नागरिकांची फसवणूक करण्याच्या प्रकारात वाढ होत असून  पोलिसांनी  प्रभावीपणे कारवाई करत सायबर आणि आर्थिक गुन्हेगारीचा बिमोड करावा, असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. पोलीस आयुक्तालयात आयोजित औरंगाबाद शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीबाबतच्या आढावा बैठकीत गृहमंत्र्यांनी संबंधितांना निर्देशित केले. यावेळी पोलीस महासंचालक संजय पांडे, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्यासह शहर पोलीस यंत्रणेचे संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पोलीसांनी समाजातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अधिक सक्रीयपणे तपास मोहिम राबवावी जेणेकरुन गुन्हेगारांना शिक्षा होण्यात वाढ होईल, यादृष्टीने कारवाई करण्याचे निर्देशित करुन गृहमंत्र्यांनी सायबर गुन्ह्यासोबतच नागरिकांचे विविध पध्दतीने होणारे आर्थिक फसवणूकीचे गुन्हे रोखण्यास प्राधान्य देऊन गुन्हेगारांमध्ये जबर निर्माण करावी.

कायदा सुव्यवस्था अबाधित राखत  नागरिकांना पोलीस प्रशासनामार्फत अपेक्षित सहकार्य तातडीने उपलब्ध होईल याची खबरदारी बाळगावी, असे सूचित करून वळसे पाटील यांनी विविध समाजमाध्यमांद्वारे दैवते, प्रसिध्द व्यक्ती, समाजपुरुष यांची बदनामी करणाऱ्या आक्षेपार्ह प्रसारणाचे प्रमाण सध्या वाढत असून त्यावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी गृहविभाग प्रयत्नशील असून अधिक परिपूर्ण प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पूरक सूचना, उपाय असल्यास सादर करावे तसेच  पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या सामान्य माणसाला आपुलकीची वागणूक आणि न्याय देण्याच्या जबाबदारीतून पोलीसांनी कृतीशील रहावे. पोलीस कॉन्सटेबल पोलीस प्रशासनाचा कणा असून त्याच्या मानसिक, शारीरिक यासोबतच कौटुंबिक स्वास्थ्याची काळजी घेतली जावी.  शहरामध्ये मनपासह इतर विविध निवडणूका येत्या काळात नियोजित असून त्या कायदा व सुव्यवस्थेच्या वातावरणात यशस्वीरित्या पार पडतील याची खबरदारी घेत नियोजन करावे. कोरोना काळात पोलिसांनी स्वत:ची तसेच कुटुंबाची जोखीम पत्करत  अहोरात्र काम केले आहे, त्याबद्दल सर्व पोलिसांचे अभिनंदन करुन कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेतही पोलीस प्रशासनाने उत्तम कामगिरी करावी, असे गृहमंत्र्यांनी सूचित केले.

महासंचालक पांडे यांनी मालमत्तेशी निगडीत गुन्हेगारी नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे असून गुन्ह्यांची तातडीने नोंद होणे, अधिक तत्पर शोध मोहिम राबविणे या गोष्टीमंध्ये वाढ करण्याचे निर्देश दिले.

पोलीस आयुक्त डॉ. गुप्ता यांनी शहर पोलीसामार्फत राबविण्यात येत असलेल्या कायदा सुव्यवस्थेच्या अंमलबजावणी अंतर्गत तपास मोहीम, दामिनी पथक, ट्राफिक हेल्पलाईन, प्रतिबंधात्मक कारवाई, शहरात संवादी तसेच सौहार्दाचे वातावरण ठेवण्यासाठी पोलीसामार्फत सुरु करण्यात आलेल्या भरोसासेल, सिटीजनसेल, सिटीजन सेंट्रीक पोलीसींग यासह राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांबाबत सविस्तर माहिती दिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles