पोर्ले/ ठाणे – पन्हाळगडाच्या पायथ्याला असणाऱ्या पोर्ले या गावी सर्पमित्र कृष्णात सातपुते वैरणीसाठी गेले असता अत्यंत दुर्मिळ असणारा ‘पोवळा’ (slender coral snake) हा साप आढळून आला.
‘पोवळा’ या सापाचे slender coral snake हे इंग्रजी नाव असून पश्चिम महाराष्ट्रात ‘रातसर्प’ तर गोव्यामध्ये ‘रक्तमांडूळ’ या नावाने ओळखला जातो. या सापाचे डोके लहान असून ते काळया रंगाचे असते. लांबट सडपातळ शरीर असणाऱ्या संपूर्ण वाढ झालेल्या पोवळ्याची कमाल लांबी ३५ सेमी इतकी असते. आखूड शेपटीवर दोन काळे आडवे पट्टे असून पोटाकडचा रंग पोवळ्यासारखा लाल असतो. या सापाची मादी वाळलेल्या पानाखाली किंवा दगडांच्या कपारीत २ ते ७ अंडी घालते. या सापाचे वास्तव्य जमिनीत, दगडाखाली किंवा वाळलेल्या पानाखाली असून तो प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, प. बंगाल, तामिळनाडू व कर्नाटक या राज्यांत आढळून येतो.
अत्यंत दुर्मिळ असणारा पोवळा (slender coral snake) निशाचर असून डिवचले गेले असता शेपटी वर करून खवल्याचा लाल रंग प्रदर्शित करतो अशी माहिती सर्पमित्र कृष्णात सातपुते यांनी लाईव्ह जनमतशी बोलताना दिली. या सर्पाला न पकडता नैसर्गिक अधिवासात जाऊ दिले. असा दुर्मिळ साप आढळून येणे हे सर्पप्रेमी व निसर्गप्रेमी यांच्यासाठी आनंदाची बाब असल्याचेही सातपुते यांनी यावेळी नमूद केले.