तुमच्या भावाला पुन्हा विधानसभेत पाठवा : वैशाली क्षीरसागर यांचे महिलांना भावनिक साद

कोल्हापूर, दि. 11 : तुमच्या अडचणी, समस्या आणि प्रश्न सोडविण्यासाठी सदैव पुढे असणारा तुमचा भाऊ राजेश क्षीरसागर यांना भरघोस मतांनी निवडून द्या, अशी भावनिक साद वैशाली क्षीरसागर यांनी महिलांना घातली. कोल्हापूर उत्तरचे महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारासाठी घरोघरी गाठीभेटी घेत असताना त्यांनी हे आवाहन केले. क्षीरसागर यांच्या प्रचाराला जोर आला आहे. सध्या ठिकठिकाणी कोपरा सभा, घरोघरी गाठीभेटी यावर भर दिला जात आहे. या कामी महायुतीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी होत असल्याचे चित्र दिसत आहे.

त्यांच्या पत्नी वैशाली यांचाही यात सिंहाचा वाटा आहे. सौ. वैशाली यांनी “भगिनी मंच”च्या माध्यमातून महिलांचे एक मजबूत संघटन उभे केले आहे. “भगिनी मंच”च्या महिला पदाधिकारी आणि समस्यांसमवेत घरोघरी भेट देऊन महायुती सरकारने महिलांसाठी केलेल्या कामांची माहिती देण्यात येत आहे. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचीही माहिती दिली जात असून कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील महिलांचा याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील माता भगिनींसाठी लाडकी बहीण ही योजना सुरू केली. राजेश क्षीरसागर यांनी या योजनेची 100 टक्के अंमलबजावणी व्हावी यासाठी मतदारसंघात जागृती मेळावे, अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शन केंद्र अशा सुविधा दिल्या. यामुळेच मतदारसंघातील सुमारे 10 हजार पेक्षा अधिक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला असल्याचे वैशाली क्षीरसागर यांनी सांगितले. आपल्या मतदारसंघातील भगिनींना या योजनेचा लाभ व्हावा यासाठी राजेश क्षीरसागर यांनी खूप परिश्रम घेतले आहेत. दरमहा पंधराशे रुपये ही रक्कम आपल्यासाठी खूप मोठी आहे. मनात आणले तर यातून आपण खूप काही करू शकतो, अशी साद वैशाली क्षीरसागर यांनी घातली. यासाठी तुमचा भाऊ राजेश क्षीरसागर यांच्या पाठीशी ताकदीने उभे राहा आणि त्यांना प्रचंड मतांनी निवडून द्या, असे आवाहनही वैशाली क्षीरसागर यांनी केले.
दरम्यान, सौ. वैशाली यांच्या प्रचार मोहिमेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे चित्र दिसत आहे.

vishal  के बारे में
vishal The live janmat is a Marathi digital News web portal. We aim to report the latest news, views, and entertainment. We seek to look at policies and decision-making from the perspective of people. Read More
For Feedback - livejanmt@gmail.com

LATEST Post