नुकत्याच झालेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंदगड विधानसभेतून शिवाजी पाटील यांची अप्रत्यक्षपणे उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी चंदगडमध्ये झालेल्या जनसन्मान यात्रेदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजेश पाटलांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे उमेदवारीसाठी चंदगड विधानसभेत महायुतीत तेढ निर्माण होण्यची दाट शक्यता आहे. या उमेदवारीवरून शिवाजी पाटील यांच्यासमोर आव्हान निर्माण झाले आहे.
अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्यात त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटातील कार्यकर्त्यांना फोडा असे आव्हान केले होते. परंतु भाजपच्या कार्यकर्त्यांमध्येच फुटीची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडींमुळे चंदगड आणि कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. पुढील निवडणुकांत काय होणार, हे देखील पाहणे महत्वाचे ठरेल.
शिवाजी पाटील शरदचंद्र पवार गटात जाणार ?
चंदगडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय भूकंप होण्याचे संकेत आहेत. शिवाजी पाटील तुतारी हातात घेणार असल्याच्या चर्चा चंदगड मतदारसंघात सुरु आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिवाजी पाटील यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे. परंतु शिवाजी पाटील कोणता निर्णय घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरेल. याकडे चंदगड विधानसभेसह कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. शिवाजी पाटील शरद पवार गटात गेले तर कोल्हापूर जिल्ह्यात भाजपाला पुन्हा खिंडार पडण्याची शक्यता आहे. कारण, काही दिवसांपूर्वी शाहू ग्रुपचे संस्थापक समरजित घाटगे यांनी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आहे, त्यामुळे शिवाजी पाटील हे शरदचंद्र पवार गटात गेले तर कोल्हापूर जिल्ह्यात भाजपाला पुन्हा मोठा धक्का बसू शकतो.
त्यामुळे येणाऱ्या आगामी काळात चंदगड विधानसभेची उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. शिवाजी पाटील यांना उमेदवारी मिळाली नाही तर शरदचंद्र पवार गटातून तुतारी हातात घेवून चंदगड विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकू शकतात अशी चर्चा मतदारसंघात आहे.