भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीच बिगुल वाजल आहे. ३ तारखेला अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे. पण गेले दोन दिवस मोठया घडामोडी घडल्याचे समजते आहे. दिलीप घाटगे यांनी भीमा बचाव संघर्ष समितीची विचार विनिमय बैठक सुस्ते येथे बोलावलेली. या बैठकीला प्रणव परिचारक आणि अजिंक्यराणा पाटील उपस्थित राहणार होते. तशा आशयाच्या पोस्ट सोशल मिडीयावर पाटील गटाकडून फिरवण्यात आल्या होत्या. पण ऐनवेळी प्रणव परिचारक यांनी या बैठकीला पाठ फिरवल्याने भीमा बचाव संघर्ष समिती कार्यकर्त्यांसह सभासदांमध्ये निवडणुकीबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.
मा. आमदार प्रशांत परिचारक हे भाजपचे विधान परिषद सदस्य आहेत. त्यांना विधान परिषद निवडणुकीसाठी भीमा-लोकशक्ती परिवाराच्या ४ जिल्हा परिषद सदस्यांनी व एका पंचायत समिती सभापतींनी मदत केली होती. याची आठवण करून देत एका वरिष्ठ भाजप नेत्यांकडून भीमा कारखाना निवडणुकीत महाडिक यांना सहकार्य करा असा मॅसेज देण्यात आल्याची चर्चा आहे. कौटुंबिक कार्यक्रमाचं कारण देत प्रणव परिचारक अनुपस्थित राहिल्याने परिचारक भीमा निवडणुकीपासून अलिप्त राहणार असल्याचे अंदाज बांधले जात आहेत.
त्यातच पाटील यांनी लोकनेते कारखाना खासगी केल्याची कधी नव्हे तेवढी चर्चा या निवडणुकीच्या निमित्ताने होत आहे. त्यामुळे भीमाची निवडणूक बाजूला राहून पाटील विरुद्ध महाडिक असा थेट सामना होईल. त्यामुळे जर परिचारक गट निवडणुकीपासून अंतर ठेवून राहणार असल्यास भीमा बचाव समितीची बाजू कमकुवत होईल. अशा परिस्थितीत नावासाठी निवडणूक लावण्याऐवजी बिनविरोध करण्याकडे परिचारकांचा कल राहील असे दिसते. आज राजन पाटील व प्रशांत परिचारक यांच्यात होणाऱ्या बैठकीनंतरच हे चित्र स्पष्ट होईल.