काँग्रेसचे पत्रक म्हणजे पालकमंत्र्यांच्या निष्क्रियतेची मूक कबुलीच -भाजपा

Live Janmat

कोल्हापूर दि.15 कोल्हापुरातील कोरोना स्थितीवर नियंत्रण मिळविण्यास पालकमंत्री पूर्णपणे अपयशी ठरले आहेत, किंबहुना कोल्हापुरातील कोरोनाच्या उद्रेकास सर्वस्वी तेच जबाबदार आहेत हे कोल्हापुरातील आम जनतेला कळून चुकले आहे. काँग्रेस ने पत्रकाद्वारे भाजपावर जे आरोप केले आहेत ते पहाता त्यांनीही मूकपणे पालकमंत्र्यांची निष्क्रियता मान्य केली आहे असेच म्हणावे लागेल.

सध्या भाजपाचे प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर टीका केली की लगेच प्रसिद्धी मिळते हे जाणून कुठलाही विषय आला की त्यांच्यावर टीका करणे हाच काही जणांचा प्रसिद्धीचा मार्ग बनला आहे. ज्यांना आयुष्यात राजकारण करुन एका वॉर्डच्या पुढे जाता जमले नाही ते राज्याचे क्रमांक दोनचे मंत्री बनलेल्या आणि आता प्रदेश अध्यक्ष म्हणून सक्षमपणे जबाबदारी पेलणाऱ्या व्यक्तीवर टीका करतात यातून त्यांची असूया स्पष्ट होते. हे म्हणजे काजव्याने सूर्यावर टीका करण्यासारखे आहे. दादांनी कोरोना काळात ‘सेवा ही संघटन’ या भाजपाच्या सूत्रानुसार राज्यभर जे काही सेवा प्रकल्प उभारले, जी काही सेवा कार्ये केली त्याची माहिती काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घ्यावी. सत्तेत असताना काहीही न करणाऱ्या पालकमंत्र्यांनी तर, सत्तेत नसताना दादा काय काय करत आहेत याचा आदर्श घेतला पाहिजे. परंतु भाजपा कार्यकर्त्यांच्या ठिकठिकाणच्या कोविड सेंटर ला विरोध करून गलिच्छ राजकारण करणार्यांना हे कसे समजणार? पालकमंत्र्यांनी जो टोल कोल्हापूरवर लादला आणि स्वतः टोल ची पावती करतानाचा फोटो समाज माध्यमांवर टाकून कोल्हापूरकर जनतेचा अपमान केला आणि ज्या टोल विरोधात कोल्हापूरकरांनी जवळजवळ 2 वर्षे तीव्र लढा दिला तो टोल, मंत्री झाल्याबरोबर एका झटक्यात चंद्रकांत दादांनी घालविला हे काँग्रेस सोयीस्करपणे विसरत आहे.

मे आणि जून महिन्यात कोल्हापुरात कोरोना संक्रमणाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली. देशात कोल्हापूर चे नाव बदनाम झाले. त्यावेळी कोरोना संक्रमणावर प्रभावी उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष करून पालकमंत्री गोकुळ चा विजय साजरा करण्यातच अधिक मग्न होते हे जनतेने पाहिले आहे. यावर भाजपाने केलेल्या आरोपास काँग्रेस ने कोणतेही उत्तर न देता वेगळेच विषय काढून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे हे त्यांच्या पत्रकावरून दिसते. काँग्रेसनेच केंद्र सरकारची बदनामी करण्याकरिता टूलकीट च्या माध्यमातून केलेले आंतरराष्ट्रीय षडयंत्र उघड झाल्यावरही तोच दाखला शहराचे काँग्रेस पदाधिकारी देत असतील तर त्यांनी आपला गृहपाठ नीट करावा आणि मगच बोलावे.

थेट पाईपलाईन ची सुरुवात कशी झाली, तज्ञानी सांगूनही तांत्रिकदृष्ट्या चुकीचा प्रकल्प कोल्हापूरकरांच्या माथी मारण्यासाठी कोणी कोणावर कसा दबाव आणला ? प्रचलित कायद्याविरुद्ध जाऊन केवळ श्रेयवादासाठी कसे चुकीच्या पद्धतीने काम सुरू केले गेले, मुळात काँग्रेस राजवटीत सर्व परवानग्या मिळालेल्या नसताना काम सुरूच का केले गेले , 25 लाखांच्या पुलाला 2 कोटी कोणी दिले ? भाजपाने सुचविलेल्या दुरुस्त्याना केवळ आपले अपयश सिद्ध होऊ नये म्हणून कसा विरोध केला गेला हे कोल्हापूरकर नीट जाणून आहेत. त्यामुळे भाजपावर कोणतेही आरोप करण्यापूर्वी काँग्रेस च्या पदाधिकार्यानी एकदा आत्मचिंतन करावे असे भाजपाचे मत आहे.
यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य महेश जाधव, भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस विजय जाधव, दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, अजित ठाणेकर, विजय खाडे उपस्थिती होते.

vishal  के बारे में
vishal The live janmat is a Marathi digital News web portal. We aim to report the latest news, views, and entertainment. We seek to look at policies and decision-making from the perspective of people. Read More
For Feedback - livejanmt@gmail.com