आज सहकारी साखर कारखान्याच्या मुद्द्यावरुन सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. शेकडो कोटी रुपये किमतीचे साखर कारखाने कवडीमोल भावाने विकले गेल्याचा आरोप सदाभाऊ यांनी आज मुंबईत केला आहे. राज्यातील अनेक सहकारी साखर कारखान्यांची विक्री करण्यात आली. हे कारखाने काही खासगी कंपन्यांकडून कवडीमोल पैशातून खरेदी करण्यात आले. याबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, मेधा पाटकर आणि अन्य नेते, समाजसेवकांनी आझाद मैदानातून कारवाईची मागणी केली होती.
राज्यातील सहकारी साखर कारखान्यांचे व्यवहार राज्य शिखर बँकेकडून झाले होते. शेकडो कोटी रुपये किमतीच्या सहकारी साखर कारखान्यांची विक्री कवडीमोल भावानं झाली. या कारखानदारांनी दिवसाढवळ्या शेतकऱ्यांच्या घरावर दरोडा टाकला. यात राज्याचे तब्बल 1200 कोटी रुपयांचे भाग भांडवल अडकलं आहे. हे कारखाने पुन्हा सहकारी होणं गरजेचं आहे. या कारखान्यासंदर्भात झालेल्या खरेदी विक्री व्यवहाराची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली. दरम्यान 7 कोटी रुपरांना खरेदी केलेल्या साखर कारखान्यावर 400 कोटी रुपयांचं कर्ज दिलं जातं. जरंडेश्वर साखर कारखान्यावर झालेल्या कारवाईनंतर ऊस कुठे घालवावा असा प्रश्न इथल्या शेतकऱ्यांना पडला आहे. या कारखान्यावर प्रशासक नेमावा आणि शेतकऱ्यांचं नुकसान थांबवावं, अशी मागणीही खोत यांनी केलीय. त्याचबरोबर सहकार क्षेञात झालेल्या घोटाळ्याबाबत आम्ही केंद्रीय सहकार मंञी अमित शहा यांची भेट घेऊन पञ देणार आहोत. या क्षेञात झालेल्या घोटाळ्याबाबत चौकशीची मागणी आपण करणार असल्याची माहितीही खोत यांनी दिलीय.