दोन्ही छत्रपती घराण्यांचा फार मोठा सामाजिक वारसा आहे. समाजाला आम्ही नेहमी एक वेगळी दिशा दिली आहे. दिशाभालू करणं आमच्या रक्तात नाही. म्हणून आपण उदयनराजेंची भेटी घेतली. आमची सविस्तर चर्चा झाली असून बहुतांश अनेक विषयांवर आमचं एकमत आहे. आमच्यात अजिबात दुमत नाही. आम्ही पूर्वीपासून एकमतानं काम करत आलो आहोत, असं संभाजीराजेंनी यावेळी सांगितलं.
उदयनराजे यांनी संभाजीराजे यांच्या कोल्हापुरातील मोर्चाला आपला पाठिंबा जाहीर केला. तसेच मराठा आरक्षणाचा प्रश्न कायदेशीर मार्गाने सुटणार नाही. त्यासाठी राज्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र आले पाहिजे, असे उदयनराजे यांनी म्हटले.
यावेळी संभाजीराजे म्हणाले की, मी पाच मागण्या मांडल्या असून मंजूर केल्यास स्वागत करु शकतो. समाज बोलला आहे, लोक बोललेत आणि लोकप्रतिनिधींनी बोलणं गरजेचं आहे. अधिवेशनाच्या माध्यमातूनही हा प्रश्न मार्गी लागू शकतो, असंही यावेळी त्यांनी सांगितलं. बऱ्याच वर्षानंतर सातारा आणि कोल्हापूर घराणं एकत्र झाल्याचा आनंद यावेळी त्यांनी व्यक्त केला. अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराज भेटीवर बोलताना ते म्हणाले की, अजित पवार यांना आशीर्वाद घ्यायचा असेल. त्या भेटीत काय झालं याची माहिती नाही. ही भेट होणार आहे याची मला कल्पना नव्हती. काही सकारात्मक होत असेल तर स्वागतच आहे.