Thursday, November 21, 2024

‘5G’ तंत्रज्ञानाने शिक्षणासह सर्वच क्षेत्रात होणार क्रांती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

- Advertisement -

मुंबई, दि. १ : फाईव्ह जी 5G नेटवर्कच्या राष्ट्रव्यापी शुभारंभ कार्यक्रमासाठी निवडलेल्या पनवेलमधील शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: विद्यार्थी बनले. खुर्ची ऐवजी त्यांनी बेंचवर बसणे पसंत केले आणि विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना मुख्यमंत्र्यांनी फाईव्ह जी चे महत्त्व सांगितले. क्रांतीकारक क्षणाचे आपण साक्षीदार असल्याचे सांगत शिक्षण, कृषी, आरोग्य, बॅंकींग यासह सर्वच क्षेत्रात फाईव्ह जी तंत्रज्ञानाने क्रांती होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज देशव्यापी फाईव्ह जी 5G तंत्रज्ञानाचा शुभारंभ झाला. यामध्ये व्हर्च्युअल क्लासरुमसाठी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पनवेल महापालिकेच्या सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक आठ मधील विद्यार्थ्यांची निवड झाली होती. या कार्यक्रमास मुख्यमंत्री श्री. शिंदे उपस्थित होते.

प्रधानमंत्र्यांच्या संवाद कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी खुर्चीऐवजी बेंचची बसण्यासाठी निवड केली. मीही तुमच्या सोबत आज विद्यार्थी झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. राष्ट्रीय शुभारंभ कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी पनवेल राज्यातील काही शाळांमधील विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधला.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, या तंत्रज्ञानामुळे इंटरनेटचा स्पीड वाढणार आहे. त्याचा फायदा सर्वाधिक शिक्षण क्षेत्राला होणार असून विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. इंटरनेटला मिळणाऱ्या स्पीडचा फायदा अभ्यासासाठी करा गेम आणि सिनेमे डाऊनलोड करण्यासाठी नाही, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

राष्ट्रव्यापी शुभारंभ कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून पनवेलच्या शाळेची निवड झाली त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतानाच प्रधानमंत्र्यांचे देखील आभार मानले. या नवीन तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल दृष्यांच्या माध्यमातून विषय समजण्यास अधिक सोपे होईल आणि शाळेचे वर्ग सामान्य वर्गवारीत न राहता ते स्मार्ट क्लास होतील, असा विश्वास व्यक्त करीत त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी गृहरक्षक दल-नागरी संरक्षणाचे अपर पोलीस महासंचालक ब्रिजेश सिंग यांनी फाईव्ह जी तंत्रज्ञानाबाबत विद्यार्थ्यांना सहज सोप्या शब्दात समजेल अशी माहिती दिली. यावेळी सादरीकरण करताना श्री. सिंग यांनी टेलीकॉम तंत्रज्ञानाचा वन जी ते फाईव्ह जी असा प्रवास चित्रांच्या माध्यमातून समजावून सांगितला. मोबाईलचा वापर स्वत:च्या सुरक्षेसाठी करा या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा देशाच्या आणि स्वत:च्या चांगल्यासाठी करा, असे आवाहनही श्री. सिंग यांनी यावेळी केले.

यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख आदी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles