राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर
आज राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सर्व सरकारी कार्यालयांना १५ टक्के कर्मचाऱ्यांनाच परवानगी देण्याचे निर्बंध घालण्यात आले आहेत. हे निर्बंध २२ एप्रिल रोजी संध्याकाळी ८ वाजेपासून १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लागू असणार आहेत.
प्रवासी वाहतूक
बसेस सोडून सर्व खासगी प्रवासी वाहतूक पर्यायांन फक्त अत्यावश्यक कारणासाठीच प्रवासी वाहतूक करता येईल. त्यासाठी चालक आणि एकूण प्रवासी क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांना प्रवासाची परवानगी असेल. हे नियम आंतरजिल्हा किंवा जिल्हांतर्गत वाहनांना लागू नसून प्रवासी राहात असलेल्या शहरांनाच लागू असतील. लोकल ट्रेनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवेश असेल. आयकार्ड तपासून प्रवेश देण्यात येईल.
उभ्याने प्रवास करण्यास मनाई असेल. खासगी बसेसला एका शहरात जास्तीत जास्त दोन थांबे घेता येतील. सर्व थांब्यांवर प्रवाशांच्या हातावर १४ दिवसांच्या क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात येईल. हा शिक्का बस सेवा पुरवणाऱ्यानेच मारणं बंघनकारक आहे. खासगी बसेसमधून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी करण्याचा किंवा न करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आला आहे.
आंतरजिल्हा किंवा जिल्हांतर्गत प्रवास अत्यावश्यक सेवा किंवा वैद्यकीय कारण किंवा अंत्यविधीसारख्या टाळता न येण्यासारख्या कारणासाठीच करता येईल. नियमभंग करणाऱ्यांवर १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल
सरकारी कार्यालय
सरकारी कार्यालये फक्त १५ टक्के कर्मचारी क्षमतेनेच कार्यरत राहतील. करोनाशी संबंधित अत्यावश्यक सेवांच्या कार्यालयांना यातून वगळण्यात आलं आहे.
लग्न समारंभ
लग्न समारंभासाठी फक्त 25 लोकांना परवानगी देण्यात आली आहे. याआधी लग्नाकरता 50 लोकांना परवानगी होती मात्र आता हे प्रमाण निम्म्यावर आलं आहे. एकाच हॅालमध्ये 2 तासात लग्न समारंभ आयोजित करता येऊ शकतो. लग्न समारंभात नियमांचं उल्लंघन केल्यास 50 हजार दंड ठोठावण्यात येईल.
इतर सर्व नियम हे १३ एप्रिल रोजी जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीनुसार लागू असतील.