कोल्हापुर : लोकशाहीत आपापल्या उमेदवारांचा प्रचार करण्याची मुभा सर्वांना आहेच. पण ज्या उमेदवाराला जनता मतदान करणार आहे, त्या उमेदवाराने सातत्याने भूतकाळातल्या आपल्या पूर्वजांनी केलेल्या कामाचे श्रेय स्वत: घेवून जनतेची दिशाभूल करु नये. याचे भान निवडणूकांचा प्रचंड अनुभव असणार्या प्रवक्त्यांनीही ठेवावे. उमेदवरानं आखलेल्या भविष्यातल्या विकास योजनांबाबत प्रवक्त्यांनी बोलण्यापेक्षा उमेदवाराने बोलावे, असा हल्लाबोल खा. संजय मंडलिक यांनी विरोधकांवर केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी कोल्हापूरात जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या नियोजनाबाबत भाजपच्या वतीने हॉटेल पॅव्हेलियन येथे कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर खास. मंडलिक पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, आमदारकीच्या निवडणुकीपासून आम्ही प्रवक्त्यांबाबत जाणून आहोत. त्यावेळी त्यांना हिंदुत्व जवळच वाटायचं. पण आज पुरोगामीत्वचा बुरखा पांघरुन उमेदवाराच्या प्रवक्त्याचं काम करत आहेत.
आपण विकास काय केला, जनता आपल्याच पाठीशी आहे असा विश्वास असणार्या उमेदवाराने या जनतेसाठी काय करणार याबाबत काहीच सांगितलेेले नाही. ही लढाई वैचारिक आहे, असं पुरोगामित्वाचं सूत्र सांगताना कोल्हापूरच्या गादीचा अपमान झाल्याचा सूर प्रवक्त्यांनी छेडला आहे. यातून विरोधकांना नक्की काय साध्य करायचे आहे, असा सवाल मंडलिक यांनी यावेळी उपस्थित केला.
ते म्हणाले, एकंदरीतच प्रवक्त्यांचा हा निवडणुकीचा उत्साह पाहता शाहू महाराजांवर ही उमेदवारी लादली गेली असल्याचेच स्पष्ट होते. आपल्या उमेदवाराचा प्रचार करताना विकासाचा एक अजेंडा देखील राबवायचा असतो याचा विसर प्रवक्त्यांना पडला असल्याचे दिसते. तब्बल 25 वर्षे याच मातीत कसलेला पैलवान अशी स्वत:ची ओळख करुन देणार्यांना हे कसे लक्षात येत नाही की, निवडणुकीला उभ्या असणार्या उमेदवाराने प्रचारावेळी आपल्या विकासाच्या अजेंड्याबाबत बोलणे किती महत्वाचे असते. प्रत्येकाने आपल्याप्रमाणे वागावे अशा हुकुमशाही थाटात प्रवक्ते वावरत आहेत. महारजांनी आपल्या गादीचा मान राखून थेट जनतेसमोर यावे आणि आपल्या प्रचार मेळाव्यात विकासाच्या दृष्टीने आपल्या योजना काय आहेत याची कल्पना जनतेला द्यावी. यासाठी प्रवक्त्यांनी न बोलता आता उमेदवारांने बोलावे, अशी रोखठोक सूचना मंडलिक यांनी यावेळी केली. चौकट प्रवक्ते की सुरक्षा रक्षक…? महाराजांच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळाल्याच्या बतावण्या करुन, आपली तटबंदी मोडायचा प्रयत्न करणार्यांना, त्रास देणार्यांना रात्री बारा वाजताही काठीने मार देणारे महाराजांचे हे नक्की प्रवक्ते आहेत की सुरक्षा रक्षक…? असा खोचक प्रश्नही मंडलिक यांनी उपस्थित केला.