Friday, September 13, 2024

करवीरकरांचे जनआंदोलन; दत्तकप्रकरण चुकीच्या पद्धतीने झाल्याचा आरोप?

- Advertisement -

कोल्हापूर संस्थानचे माजी अधिपती छत्रपती शहाजी महाराज यांनी आपल्या कन्येच्या चिरंजीवाला दत्तक घेतले ते दत्तक पुत्र म्हणजे सध्याचे शाहू महाराज त्यांचे पूर्वीचे नाव दिलीपसिंह होते. शहाजी महाराजांनी दत्तक घेतल्यानंतर त्यांचे ‘शाहू’ असे नामकरण झाले. त्यांना दत्तक घ्यायला तेव्हा कोल्हापुरात जनतेतून प्रचंड विरोध झाला होता.राजर्षी शाहू छत्रपती यांचे पुत्र छ. राजाराम महाराज यांची कन्या प्रिन्सेस पद्माराजे यांचा मुलगा छ.शहाजी महाराज यांनी दत्तक घ्यावा, यासाठी छ.राजाराम महाराजांच्या पत्नी छ.विजयमाला राणीसाहेब यांच्या नेतृत्वाखाली अवघे कोल्हापूर तेव्हा रस्त्यावर उतरले होते; पण छ.शहाजी महाराज यांनी आपल्या मुलीचा मुलगा नागपूरचे दिलीपसिंह यांना दत्तक घेतले. त्यावेळच्या उद्रेकामुळे १९६२ सालचा शाही दसरा सोहळा होऊ शकला नाही व नंतर १९८१ पर्यंत शाही दसरा सोहळा खंडितच झाला. १९८२ पासून तो पुन्हा सुरू झाला.

छत्रपती विजयमाला राणीसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

शहाजी महाराज यांनी पद्याराजेंचा पुत्र दत्तक न घेता आपल्या मुलीचे चिरंजीव दिलीपसिंह यांना दत्तक घेण्याच्या हालचाली चालवल्या. यामुळे शहरासह जिल्ह्यात संतापाची लाट उसळली. सर्व तालमी, मंडळे, सामाजिक संस्था यांनी एकमुखी ठराव करीत पद्माराजे यांच्या पुत्रासच दत्तक घ्यावे, अशी मागणी केली. कोल्हापुरात सायकल फेच्या निघाल्या, कोपरा सभा झाल्या. एवढेच नव्हे तर रात्री पेठापेठांतून मशाल मिरवणुका काढण्यात येत होत्या. सर्व राजकीय पक्षांनी बिंदू चौकात सभा घेऊन पद्माराजे यांच्या पुत्रासच दत्तक घ्यावे, अशी जाहीर मागणी केली.

२४ जून १९६२ रोजी न्यू पॅलेसवर मोर्चा दिवशी कडकडीत हरताळ पाळण्यात आला होता. शहराच्या सर्व प्रमुख मार्गावरून भव्य मोर्चा निघाला. तेव्हा त्यात महिलाही मोठ्या प्रमाणात सहभागी झालेल्या होत्या. साऱ्या रस्त्यांवर अक्षरशः जनसागर उसळला होता. शहाजी महाराजांचा निषेध करणारी काळी निशाणे फडकावीत दत्तकविरोधी घोषणा देत हा मोर्चा न्यू पॅलेसवर धडकला. मोर्चाचे नेतृत्व छ. राजाराम महाराज यांच्या पत्नी छ. विजयमाला राणीसाहेब करीत होत्या. त्यांच्या नेतृत्वाखालील मोर्चाचा जनसागर न्यू पॅलेसवर आला. न्यू पॅलेसचे प्रवेशद्वार बंद होते. प्रचंड पोलिस बंदोबस्त होता व न्यू पॅलेसला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते, मोर्चा बराच वेळ थांबला; पण न्यू पॅलेसमधून काही बोलावणे आले नाही. तेव्हा कम्पाऊंडवरून उड्या मारून लोक आत शिरले. गोंधळ उडाला. मग शहाजी महाराजांनी प्रमुख मंडळींना बोलावले; पण दत्तकाच्या निर्णयात बदल होणार नाही, असे त्यांनी सांगितले. शहाजी महाराजांचे उत्तर कळताच जनता खवळली. जोरदार दगडफेक झाली. पोलिस वायरलेस वाहने जाळण्यात आली. संतप्त तरुणांनी न्यू पॅलेसवर काळे निशाण लावले. दगडफेकीत पोलिसांसह अनेक जण जखमी झाले. लाठीमार आणि अश्रुधुराचा वापर झाला. १४४ कलम लावून जमावबंदी जारी करण्यात आली.

दत्तक प्रकरणात प्रिन्सेस पद्याराजेंना राजर्षी शाहू महाराज यांच्या नातीला न्याय मिळाला पाहिजे, या स्वयंस्फूर्त भावनेतून कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील जनता अक्षरशः पेटून उठली. विधानसभेत आ. त्र्यं. सी. कारखानीस यांनी हा प्रश्न उपस्थित केला. विधानसभेत हे प्रकरण गाजत असतानाच कोल्हापुरात दत्तकविधी कार्यक्रम करणे शक्य नसल्यामुळे त्याच दिवशी बंगळुरात शहाजी महाराज यांनी आपल्या कन्येचे चिरंजीव दिलीपसिंह यांना दत्तक घेतले. दत्तकविधानाचे वृत्त कोल्हापुरात वाऱ्यासारखे पसरले.घराघरांवर काळी निशाणे फडकावीत कोल्हापुरात हरताळ पाळण्यात आला. विद्यार्थ्यांनी शाळा कॉलेज बंद पाडली. जिल्ह्यातही ठिकठिकाणी उत्स्फूर्त हरताळ पाळण्यात आला. शिरोळ नृसिंहवाडी मार्गावर टेलिफोन तारा तोडण्यात आल्या. खांब वाकवण्यात आले. नवी दिल्लीत कोल्हापूरच्या राजकन्या पद्याराजे यांनी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री लालबहादूर शास्त्री यांची भेट घेतली. कोल्हापूरचे दत्तकविधान चुकीच्या पद्धतीने झाल्याचे पद्याराजे यांनी शास्त्री यांना पटवून दिले. शास्त्री यांनी दत्तकविधानाबाबत फेरविचार करण्याचे आश्वासन दिले.

दत्तकविधान झाले; पण जनभावना एवढ्या संतप्त होत्या, की शहाजी महाराज यांना सार्वजनिक ठिकाणी येणे मुश्कील झाले. १९६४ पासून शहाजी महाराजांनी १९८१ पर्यंत दसरा चौकातील शाही दसरा सोहळा व शमीपूजन बंदच केले. १९६४ ते १९८१ या काळात दसरा चौकातील शाही दसरा महोत्सव खंडितच झाला. दसरा चौकात सोने लुटण्याच्या कार्यक्रमाला छ. शहाजी महाराज अथवा शाहू महाराज या काळात कधी आले नाहीत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles