ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू पॅट कमिन्सनं 50 हजार अमेरिकी डॉलर पीएम केअरला दिले आहेत.हा खेळाडू यंदा आयपीएलमध्ये कोलकात्याच्या संघाकडून खेळत आहे.
भारतामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला असताना दुसरीकडे इंडियन प्रिमियर लिग म्हणजेच आयपीएल ही स्पर्धा खेळवली जात असल्याच्या मुद्द्यावरुन आता हळूहळू सोशल मीडियावर चर्चा रंगू लागली आहे. आयपीएलच्या आयोजनासंदर्भात प्रश्न चिन्ह निर्माण होत असतानाच आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या एक परदेशी खेळाडूने सामाजिक भान जपत भारतातील ऑक्सिजनच्या पुरवठ्याची समस्या सोडवण्यासाठी पुढे आला आहे.
कमिन्सने यासंदर्भात एक मोठा मेसेज लिहिला असून त्याने आपल्याला भारत अतिशय आवडता देश असून मी माझ्या आयुष्यातील काही सर्वात चांगल्या लोकांना या देशात भेटल्याचं म्हटलं आहे. तसेच या संकटाच्या काळामध्ये आयपीएलसारख्या स्पर्धांच्या आयोजनामधून देशातील लोकांना थोडा विरंगुळा मिळेल असा सरकारचा या स्पर्धेच्या आयोजनाला परवानगी देण्यामागील दृष्टीकोन असल्याचंही कमिन्सनने म्हटलं आहे. इतकच नाही तर कमिन्सने आयपीएलमध्ये खेळणाऱ्या जगभरातील इतर खेळाडूंनीही पुढाकार घेत या संकटाच्या काळामध्ये मदत निधी द्यावा आणि मदतीसाठी पुढे यावं असं आवाहन केलं आहे. मी केलेली मदत फार नाहीय पण त्यामुळे काही लोकांच्या आयुष्यात नक्कीच बदल घडेल अशी मला आशा आहे, असंही कमिन्सने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. पॅट कमिन्स सध्या कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळतो.त्यांनं ट्विट करुन ही माहिती दिली.